Iranian Sailors’ India Visit Before the IRIS Dena Attack: अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धात दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत युद्धनौकेवर पाणबुडीच्या टॉर्पेडोने हल्ला करण्यात आला. भारताच्या विनंतीनंतर नौदल कवायतींसाठी विशाखापट्टणम येथे आलेली युद्धनौका इराणला परतत असताना श्रीलंकेजवळ हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला. यानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले आहे. दरम्यान

दरम्यान इराणच्या युद्धनौकेवरील खलाशांनी भारतात काय काय केले होते, याची माहिती समोर येत आहे. द इंडियन एक्सप्रेसने १९ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणममधील इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू (IFR) मिलान २०२६ नौदल सरावानंतर इराणी खलाशांनी पर्यटनाचा आनंद कसा घेतला, त्यांचे अखेरचे क्षण कसे होते, याचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे.

भारतात असताना इराणी खलाशांनी ऋषिकोंडा टेकडी ज्याला कैलासगिरी म्हणून ओळखले जाते, याठिकाणी भेट दिली. तसेच विजय स्मारक, पाणबुडी संग्रहालय आणि वैझागच्या संकल्प कला गावाला भेट दिली. मिलान २०२६ च्या ठिकाणी लावलेल्या मंडपात त्यांनी चहा-नाश्त्याचा आनंद घेतला. वैझाग येथील कवायतींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही हजेरी लावली होती.

भारतीय नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणी खलाशांनी भारतीय युद्धनौकेला भेट दिली. तसेच भारतीय नौदल अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी माहितीची देवाणघेवाण केली. तरूण इराणी अधिकाऱ्यांनी आपला अनुभव संपन्न करण्याचा प्रयत्न केला. तरूण खूपच आनंदी होते, आम्ही एकत्र चांगला वेळ घालवला, असे एका भारतीय नौदल अधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले, सरावाच्या शेवटच्या दिवशी इराणी खलाशी पर्यटन आणि खरेदीसाठी गेले. कैलासगिरी येथील काचेचा स्कायवॉक पाहून ते खूपच आकर्षित झाले होते. आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांनी भारतीय विणकाम केलेले कपडे विकत घेतले होते.

बीच रोडवर जिथे कवायत पार पडली होती, तेथील ग्रामीण विकास बँकेच्या एका सदस्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, त्यादिवशी खूपच सुंदर परेड झाली. मी इराणी खलाशांना पाहिले होते. कवायतीच्या आदल्या दिवशी त्यांचा सराव झाला होता, तेही मी पाहिले होते. खलाशी सेल्फी घेत होते. त्यांच्या ग्रुपबरोबर फोटो आणि व्हिडीओ काढण्यात ते मग्न होते. स्थानिकांशीही त्यांनी संवाद साधला होता. त्यांच्याबरोबर असे काही होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

अमेरिकेला त्यांच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा लागेल – इराण

अमेरिकेला त्यांच्या या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा लागेल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी दिला आहे. एक्सवर अरागची यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, “इराणच्या किनाऱ्यापासून २००० मैल दूर असलेल्या युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला. ही नौका भारताच्या निमंत्रणावर गेली होती. त्यात १३० खलाशी होते. कोणतीही पूर्वसूचना न देता आंतरराष्ट्रीय समुद्रात अमेरिकेने हा क्रूर हल्ला केला.”