भारत व पाकिस्तान यांच्या सैन्यामध्ये १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात चकमक सुरू होण्याच्या काही आठवडे अगोदर पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी हेलिकॉप्टरमधून प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडली होती. भारतीय प्रदेशात ११ कि.मी आतमध्ये त्यांनी एक रात्रभर वास्तव्य केले होते, असा गौप्यस्फोट त्यांच्या एका माजी सहकाऱ्याने केला आहे.
निवृत्त कर्नल अशफाक हुसेन हे त्यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी असे सांगितले की, मुशर्रफ यांनी २८ मार्च १९९९ रोजी ताबा रेषा ओलांडली व ते भारतीय प्रदेशात अकरा कि.मी. आत आले होते.
मुशर्रफ यांच्या समवेत त्यावेळी ब्रिगेडियर मासून अस्लम होते, त्यांनी त्यावेळी झिकिरिया मुस्ताकर येथे वास्तव्य केले होते. यावेळी कर्नल अमजद शब्बीर यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडी उपस्थित होती.
मुशर्रफ हे त्यावेळी लष्करप्रमुख होते व ते दुसऱ्या दिवशी परत गेले. हुसेन यांनी त्यांच्या विटनेस टू ब्लंडर-कारगिल स्टोरी अनफोल्ड्स या पुस्तकात प्रथम हा गौप्यस्फोट केला होता. ते पुस्तक २००८ मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्यांनी काल रात्री एका टीव्ही चर्चा कार्यक्रमात सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने प्रथम प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून १८ डिसेंबर १९९८ रोजी भारतीय हद्दीत प्रवेश केला व त्यावेळी कॅप्टन नदीम व अली तसेच हवालदार लालिक जान यांना मोहिमेवर पाठवण्यात आले होते. त्यांना या मोहिमेचे उद्दिष्ट कधीच सांगितले गेले नव्हते व त्यांना टेहळणीसाठी कुठलीही प्राथमिक माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या अनेक तुकडय़ांना ताबा रेषा ओलांडण्यास सांगून भारतीय हद्दीत पवित्रा घेण्यास सांगितले होते, त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या तुकडय़ांमध्ये भारतीय हद्द ओलांडून जास्तीत जास्त आत घुसण्यासाठी स्पर्धाच सुरू झाली. ही घुसखोरी एका भारतीय मेंढपाळाच्या लक्षात आली व त्याने भारतीय लष्कराला त्याची माहिती दिली. कारगिलमधील प्रत्येक मोहिमेसाठी कुठलेच उद्दिष्ट ठरवून दिले नव्हते, ही मोहीम उत्तरेकडील कमांडचे प्रमुख मेजर जनरल जावेद हसन यांनी आखली होती. हसन यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवर पाकिस्तानी सैन्य घुसवण्याची योजना आखली व रावळपिंडीचे कॉर्पस कमांडर लेफ्टनंट जनरल महमूद अहमद, चिफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल महंमद अझीझ व मुशर्रफ यांना ती पटवून दिली, असे हुसेन यांनी सांगितले. त्यानंतर मे महिन्यात भारत व पाकिस्तानी सैन्यात धुमश्चक्री सुरू झाली. मुशर्रफ यांनी ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत मुक्काम केल्याच्या घटनेनंतर एक महिन्याने हे घडून आले. नॉर्थर्न लाइट इन्फंट्रीशिवाय, ३४ आझाद काश्मीर रेजिमेंट, २४ सिंध रेजिमेंट, फ्रंटियर फोर्स रेजिमेंट व आर्टिलरी युनिट्स यांनी कारगिल मोहिमेत भाग घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हुसेन यांनी कारगिल मोहिमेत भाग घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारित असलेले हे पुस्तक लिहिले आहे. कारगिल मोहीम यशस्वी झाल्याचा मुशर्रफ यांचा दावा त्यांनी या पुस्तकात फेटाळला आहे.  कारगिल संघर्षांत पाकिस्तानने केवळ २७० सैनिक गमावले हा दावाही त्यांनी फेटाळला आहे.

व्ही. के. सिंग यांची मुशर्रफस्तुती!
कारगिल चकमकीआधी परवेझ मुशर्रफ यांनी केलेल्या ‘सीमोल्लंघना’च्या धाडसाबाबत भारताचे माजी लष्करप्रमुख व्ही. के.सिंग यांनी त्यांची पाठ थोपटली. सिंग म्हणाले की, मुशर्रफ यांनी आपल्या कृत्यातून लष्कर प्रमुखाच्या धाडसाचे दर्शन करून दिले. या काळात भारतीय लष्कराने पाकिस्तानी चमूला भारतीय हद्दीमध्ये शिरून देण्याची तसेच मुशर्रफ यांना सुरक्षितरीत्या परतू देण्याची चूक केल्याचेही त्यांनी म्हटले. भारतीय हद्दीमध्ये ११ कि.मी शिरण्यातील धोका लक्षात घेऊनही त्यांचे कृत्य मात्र त्यांच्या धाडसाचे दर्शन असल्याचे सिंग म्हणाले.