आंदोलनाकरिता जात असताना मेधा पाटकर यांना अटक

मेधा पाटकर यांच्यासह १० जणांना सकाळी अलाहाबाद विद्यापीठ आवारात जमले असताना अटक करण्यात आली.

मेधा पाटकर (संग्रहित छायाचित्र)
उत्तर प्रदेशात वीज प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करीत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर व त्यांच्या सहकाऱ्यांना कचरी खेडय़ाकडे कूच करीत असताना अटक करण्यात आली, तेथे जाऊन ते आंदोलन करणार होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी सांगितले की, पाटकर व इतरांवर जिल्हा प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता संवेदनशील भागात आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेधा पाटकर यांच्यासह १० जणांना सकाळी अलाहाबाद विद्यापीठ आवारात जमले असताना अटक करण्यात आली. ट्रान्स यमुना भागात कचरी येथे ते आंदोलन करणार होते. शांतताभंगाची शक्यता गृहीत धरून त्यांना गुन्हेगारी दंडसंहिता कलम १५१ अन्वये अटक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता संवेदनशील भागात ते जाणार होते. पंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असताना कचरी या गावाला भेट देण्यास कुणालाही परवानगी देणे शक्यही नव्हते. करछाना औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणावरून कचरी येथे शेतकऱ्यांनी हिंसक निदर्शने केली असून पोलिसांशी त्यांच्या चकमकी झाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Before protest police arrest medha patkar