आंध्रप्रदेशातील अनंतपूरमधल्या राप्तडू येथील एका जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी एका माथेफिरूने दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गात घुसून यांत्रिक करवतीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. एका शिक्षिकेने आता या प्रकरणाचा थरार काय होता ते सांगितलं आहे.
शिक्षिकेने नेमकं काय सांगितलं आहे?
शिक्षिका राजेश्वरी यांनी सांगितलं, “साधारण सकाळी १०.३० च्या सुमारास एक २१ वर्षांचा तरूण अचानक वर्गात घुसला. त्याच्या हातात यांत्रिक करवत होती. मी तेव्हा वर्गातच होते. काय घडतं आहे ते कळायच्या आतच हा हल्ला झाला. हल्ला झाला तोपर्यंत सगळे वर्ग शांतपणे सुरू होते. आम्ही वर्गाचे दरवाजे उघडेच ठेवत असतो. तेवढ्यात अचानक तो तरूण आला आणि त्याने हल्ला केला. काही कळण्याच्या आतच हा हल्ला झाला. त्याच्या हातात यांत्रिक करवत आहे हे समजायलाही आम्हाला थोडा वेळ लागला, पण तोपर्यं हल्ला झाला होता असं राजेश्वरी यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
राजेश्वरी यांनी आणखी काय सांगितलं?
राजेश्वरी पुढे म्हणाल्या की जेव्हा ही घटना घडली तेव्हा अचानक सगळ्या वर्गात आणि शाळेत हलकल्लोळ माजला. अजूनही लोक या धक्क्यात आहेत की ही घटना कशी काय घडली? शाळेच्या परिसरात काम चाललं आहे. सुरूवातीला आम्हाला वाटलं त्यापैकीच कुणीतरी आहे का? कारण शाळेच्या परिसरात काम चाललं असल्याने अनेक कामगार शाळेच्या परिसरात वावरत होते. यांत्रिक करवतीचा आवाज आला आणि तो हल्लेखोर थेट वर्गात शिरला. त्याने हल्ला केल्यानंतर आता सगळे धावू लागले. किती हल्लेखोर होते ते तेव्हा कळलं नाही. अनेकांना वाटलं की त्यांच्यावरही हल्ला झाला आहे म्हणून ते पळत होते. असं सांगत राजेश्वरी यांनी घटनेचा तो थरार सांगितला.
पोलिसांनी या प्रकरणी नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी सांगितलं की, शाळेत दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे काही शिक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला कामगार समजून आत जाऊ दिले. मुलीच्या गळ्यावर आणि पोटावर खोल जखमा झाल्या असून, तिचा उजवा हात जवळजवळ तुटला आहे. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारी दुसरी मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्लेखोराला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. घटनेपूर्वी त्या व्यक्तीची आणि मुलीची ओळख होती का, याचा तपास अद्याप पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा बहुआयामी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामुळे शाळेत प्रचंड घबराट पसरली, घटना घडत असताना विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिथून पळ काढला. तो माणूस पळून गेल्यावर शिक्षकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली आणि रुग्णवाहिका बोलावली.
