Iran Mocks US  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ‘होर्मुझच्या सामुध्रुनी’तून (Strait of Hormuz) होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी इतर राष्ट्रांना मदतीचे आवाहन केले. मात्र, इराणने या विनंतीची खिल्ली उडवली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, अमेरिकेचे सुरक्षा कवच “छिद्रांनी भरलेले” (कुचकामी) आहे. त्यांनी असा दावाही केला की, होर्मुझ सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आता चीनसारख्या देशांकडे “याचना” करत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेला हा भाग आता वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

अराघची यांनी काय म्हटले?

“अमेरिकेचे तथाकथित सुरक्षा कवच कुचकामी ठरले असून ते संकटांना रोखण्याऐवजी निमंत्रण देत आहे. अमेरिका आता होर्मुझ सुरक्षित करण्यासाठी इतरांकडे, अगदी चीनकडेही मदत मागत आहे. इराण आपल्या शेजारी राष्ट्रांना आवाहन करतो की, त्यांनी विदेशी आक्रमकांना हाकलून लावावे, कारण त्यांचा एकमेव हेतू इस्रायलचे रक्षण करणे हाच आहे,” असे अराघची यांनी नमूद केले.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “अनेक देश विशेषतः इराणच्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रयत्नामुळे प्रभावित झालेले देश, होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवतील आणि अमेरिकेसोबत सामील होतील. आम्ही इराणची लष्करी क्षमता १०० टक्के नष्ट केली आहे. मात्र, त्यांचा कितीही पराभव झाला तरी होर्मुझच्या या जलमार्गात कुठेही एक किंवा दोन ड्रोन पाठवणं, भूसुरुंग टाकणं किंवा क्षेपणास्त्र डागणं हे इराणसाठी सोप्प आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन यांच्यासह या कृत्रिम नाकेबंदीमुळे प्रभावित झालेले इतर देशही या भागात त्यांच्या युद्धनौका पाठवतील”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

होर्मुझची सामुध्रुनी हा एक धोरणात्मक मार्ग आहे, जिथून जगातील एकूण तेल पुरवठ्याचा साधारणपणे एक पंचमांश (१/५) भाग जातो. इराणने या मार्गावर कडक नियंत्रण ठेवले असून, अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांवर निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांमुळे तेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी वॉशिंग्टन प्रयत्नशील आहे.