मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने आमची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असं सांगत तिच्यावर तिच्या कुटुंबाकडून प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. झारखंडच्या छत्रा जिल्ह्या ही घटना घडली. या घरातील मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरोधात जात आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे तिच्या कुटुंबाने प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि मुलीचा निषेध नोंदवत प्रतीकात्मक अंत्यविधी केले. अंत्यसंस्कारानंतर तिचं श्राद्ध घालण्यात आलं आणि पिंडदानही करण्यात आलं. दुसरीकडे मुलीच्या सासरच्यांनी तिच्या कुटुंबावर हा आरोप केला आहे की अशा प्रकारे कृती करणं ही घटना म्हणजे एकप्रकारे धमकी आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

सदर घटनेबाबत पोलिसांनी ही माहिती दिली की २१ वर्षांच्या एका मुलीने तिच्या पसंतीने आंतरजातीय विवाह केला. ज्यानंतर तिच्या कुटुंबाने म्हणजेच तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या लग्नानंतर २१ दिवसांनी तिचं श्राद्ध घातलं आणि अंत्यविधी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी ब्राह्मण कुटुंबातील आहे. तिने एका अग्नीवीर सैनिकाशी लग्न केलं जो दांगी समाजाचा आहे. झारखंड मध्ये हा समाज ओबीसी म्हणून गणला जातो. मुलीने जातीबाहेर लग्न केल्याची बाब तिच्या घरातल्यांना प्रचंड खटकली. त्यामुळेच तिचे प्रतीकात्मक अंत्यविधी करुन आणि श्राद्ध घालून तिचा निषेध नोंदवण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

मुलीच्या आईने काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगी २१ वर्षांची आहे. तिच्या कुटुंबाने हे सांगितलं की मुलीने आमच्या मनाविरोधात जाऊन लग्न केलं आहे. तसंच तो मुलगा आमच्या जातीतला नाही. त्यामुळे आम्ही तिचा निषेध नोंदवला. पोलीस अधिकारी पुरुषोत्तम अग्निहोत्री यांनी असंही सांगितलं होतं की आमच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आहे. तसंच अग्निहोत्री यांनी सांगितलं की सदर मुलीचं अपहरण वगैरे झालेलं नाही. तिने तिच्या मर्जीने लग्न केलं आहे. दुसरीकडे इंडियन एक्स्प्रेसने मुलीच्या कुटुंबाशी संवाद साधला. मुलीच्या आईने असं सांगितलं की आम्हाला तिने सदर लग्नाबाबत वगैरे किंवा नात्याबाबत काहीही कल्पना दिली नाही. तिने एका सैनिकाशी लग्न केलं आहे आणि तो आमच्या जातीचा नाही. तसंच आम्ही तिच्यासाठी स्थळं बघत होतो, तसंच आम्ही तिचं लग्न करायचं त्याची तयारी करायची म्हणून पाच लाख रुपये खर्च केले होते. आम्हाला आमच्या मुलीने सांगितलं की मी कॉलेजला जाते आहे आणि ती निघून गेली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

मुलाच्या आईने काय सांगितलं?

ज्या मुलीने सैनिकाशी लग्न केलं त्याच्या आईने सांगितलं की माझ्या मुलीने त्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं. आता आम्हाला कुठलंही भांडण किंवा वाद नको. आम्ही या दोन्ही मुलांचा निर्णय स्वीकारला आहे.