महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी त्यांच्यावर शाई फेक करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज आयोजित केलेल्या बेळगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासूनच बेळगावसह उपनगर, सीमाभागातील व्यवहार कडकडीत बंद होते. अनेक मंडळांनी फलकावर बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन कालपासून बेळगाव येथे सुरू होणार होते. त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली केली. या घटनेमुळे बेळगाव सीमाभागात एकच खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ बेळगाव बंदची घोषणा करण्यात आली. तर टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांच्या विरोधात शाई फेकणे, जीवे मारणे या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेळगावातील मराठी भाषकांचा संताप आज सकाळपासूनच दिसून आला. बेळगाव शहरातील व्यवहार सकाळपासून ठप्प होते. उपनगरातीलही व्यवहार कडकडीत बंद होते. संपूर्ण सीमाभागात बंदला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विक्रेते, दुकानदारांनी आपल्या बंद दरवाजावर दळवी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवत आज व्यवसाय बंद राहणार असल्याच्या पाट्या चिकटवल्या आहेत. शहरातील मराठी भाषक तरुण मंडळांच्या फलकावर या घटनेचा निषेध नोंदवत आजच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या घटनेची दखल घेऊन बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.