Belgaum Election Result : बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता; महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट

बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असे संजय राऊत यांनी म्हटले होते

Belgaum Mahanagarpalika Election Result, Belgaum Municipal Election Result

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने ३६ जागा मिळवत बहुतमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाला ३६ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ९ आणि इतरांना बेळगावी नगरपालिकेच्या एकूण ५८ जागांपैकी १३ जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव अशी आशा आम्ही करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपाने बेळगाव महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.

बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांसाठी शुक्रवारी प्राथमिक अंदाजानुसार ५५ टक्के मतदान झाले होते. मराठी अस्मितेचे दर्शन घडवण्यासाठी मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला होता. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच चिन्हावर उतरले होते. त्यामध्ये भाजपा ५५, काँग्रेस ४५, धर्मनिरपेक्ष जनता दल ११, आम आदमी ३७, एमआयएम ७, अन्य दोन अपक्ष अशा २१७ उमेदवारांचा समावेश होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Belgaum mahanagarpalika election result municipal election result updates congress bjp shivsena abn