Belgian court approves Mehul Choksi extradition to India fugitive diamond trader PNG Bank loan fraud : पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे १३ हजार कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात फरार मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी बेल्जियम येथील एका न्यायालयाने हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. तसेच न्यायालयाने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांकडून झालेली त्याची अटक वैध असल्याचा निर्णय दिला आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चोक्सी यााल भारतात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मेहुल चोक्सी याच्याकडे अद्याप वरिष्ठ न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे त्याला लगेचच आणले जाऊ शकत नाही , मात्र पहिला आणि खूप महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

यापूर्वी बेल्जियमच्या अँटवर्प येथील न्यायालयाने शुक्रवारी भारतच्या बाजूने आणि चोक्सीच्या वतीने बेल्जियमच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला आणि त्याची अटक आणि भारताची प्रत्यार्पणाची विनंती पूर्णपणे वैध असल्याचा निर्णय दिला. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या अधारे ११ एप्रिल रोजी अँटवर्प पोलिसांनी ६५ वर्षीय चोक्सीला अटक केली होती आणि तो चार महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात आहे. चोक्सीने बेल्जियमच्या विविध न्यायालयांमध्ये जामिनासाठी अर्जही केला होता, पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.

मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत?

१) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत.

२) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

३) नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना एलओयू(लेटर ऑफ अंडरटेकिंग), फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.