Belgium PM Bart De Wever India Visit: बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आणलेली चॉकलेटपासून बनवलेली इंडिया गेटची प्रतिकृती प्रवासात खराब झाली. पण, चॉकलेटची दुसरी प्रतिकृती कोणत्याही परिस्थितीत मोदींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वेव्हर म्हणाले. चॉकलेट डिप्लोमॅटिक संबंध मजबूत करण्यासाठी उत्तम असतात, असेही वेव्हर आज (०३ सप्टेंबर) दिल्लीत बोलताना म्हणाले.
पंतप्रधान मोदींसाठी आणलेली भेट प्रवासात खराब
“मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास भेट द्यायची होती. बेल्जियममधील उत्तम दर्जाच्या चॉकलेटपासून बनवलेली इंडिया गेटची प्रतिकृती मी त्यांना भेट देणार होतो”, असे बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर म्हणाले.
“जवळपास १०० वर्षांपासून उभ्या असणाऱ्या खऱ्या इंडिया गेटप्रमाणे, चॉकलेटपासून बनवलेले इंडिया गेट भारतात पोहोचेपर्यंत टिकलेच नाही. प्रवासात ते खराब झाले. आमच्या लक्षात आलं की चॉकलेट डिप्लोमॅटिक संबंध मजबूत करण्यासाठी उत्तम आहे, पण त्याचा डिप्लोमॅटिक प्रवास तितका सोपा नाही. पण, काळजी करण्याची गरज नाही. बेल्जियममध्ये या चॉकलेट इंडिया गेटची दुसरी प्रतिकृती तयार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ती सुरक्षितपणे पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल”, असेही आश्वासन पंतप्रधान बार्ट डी वेव्हर म्हणाले.
इंडिया गेटचेच प्रतीक का निवडले?
पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी इंडिया गेटचेच प्रतीक का निवडले? याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही इंडिया गेटचेच प्रतीक का निवडले, यामागे एक खास कारण आहे. इंडिया गेटचा, भारत आणि बेल्जियमच्या इतिहासाशी संबंध आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक भारतीय सैनिक हजारो किलोमीटरचा प्रवास करून बेल्जियममध्ये लढण्यासाठी गेले होते. त्यापैकी अनेक सैनिकांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची बेल्जियमला आजही आठवण आहे”, असे बार्ट डी वेव्हर म्हणाले.
पंतप्रधान वेव्हर यांनी सांगितला इतिहास
इंडिया गेटवरील या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ असलेल्या शिलालेखाचा एक भाग आम्ही चॉकलेटच्या प्रतिकृतीवर मोठा करून दाखवला आहे. हा दोन्ही देशांच्या इतिहासाची आठवण करून देतो. तसेच तो आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो जगात शांतता कायमची गृहीत धरता येत नाही; शांततेसाठी सतत प्रयत्न करावे लागतात. आजच्या जगातील परिस्थिती पाहता हा संदेश पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे, असे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर म्हणाले.
मोदींनी मेलोनी यांना दिली होती मेलडी चॉकलेटची भेट
पंतप्रधान नरेंद्र मे महिन्यात इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी चॉकलेट भेट दिले होते. पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तसेच, यावरुन मोदींवर जोरदार टीका देखील झाली होती. काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर टीका केली होती तसेच, अनेक मीम्सच्या माध्यमातून ट्रोलिंग झाले झाले होते.
