बंगळुरू शहरात बेलांदूर तळ्याजवळ कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने शहरामध्ये धूर पसरला आहे. हा धूर विषारी असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.  बंगळुरू शहरात बेलांदूर तळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. गुरुवारी या कचऱ्याला आग लागली. बऱ्याचदा येथे पडलेल्या सुक्या कचऱ्याला आग लावण्यात येते परंतु गुरुवारी लागलेली आग पूर्ण परिसरात पसरली. या आगीमुळे प्रचंड प्रमाणात धूर निर्माण झाला. हा धूर विषारी स्वरुपाचा होता. अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. मागील काही वर्षापासून बेलांदूर तळ्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. ही आग विझवण्यात आली असली तर धुराचे लोट अद्यापही कमी झाले नाहीत. या धुरामुळे अनेक विकार जडतील अशी भीती देखील नागरिकांना वाटत आहे.

या प्रकरणाची दखल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण यांनी घेतली आहे. यापुढे तळ्याच्या आजूबाजूला कचरा टाकण्यात येऊ नये याकडे लक्ष द्यावे असे आदेश त्यांनी दिले आहेत. हे तळे ज्या भागात आहे त्या भागापासून जवळच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक राहतात. या आगीची चर्चा सोशल मिडियावर देखील होत आहे. आपण या भागात अनेक वर्षे वास्तव्यात होतो.

येथील परिस्थिती अतिशय भयंकर आहे असे एका जणाचे म्हणणे आहे. तर, केवळ बंगळुरूच नव्हे तर मुंबईतील देवनार, दिल्लीतील गाझीपूर या शहरांना देखील डम्पिंग ग्राउंडमुळे अनेक त्रास होत आहे याकडे एका जणाने लक्ष वेधले आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्यास राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचीही तक्रार त्याने केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची वाढ झाल्यामुळे शहरात प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहेत. त्यात बेलांदूर तळ्याच्या आगीसारख्या घटनेमुळे भर होत आहे. दिवसेंदिवस हे शहर प्रदुषणाच्या बाबतीत भयावह होत असल्याचे एका ट्विटर युजरने म्हटले आहे.