त्विशा शर्मा या मॉडेल आणि अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या सासरी १२ मे रोजी आढळून आला. त्यानंतर या प्रकरणात अनेक पैलू समोर येत आहेत. आमच्या मुलीला तिच्या नवऱ्याने म्हणजेच समर्थने ठार केलं असा आरोप त्विशा शर्माच्या आई वडिलांनी केलाय. त्विशाची सासू गिरीबाला सिंग या माजी न्यायाधीश आहेत. त्यामुळे या प्रकरणात दबाव टाकला जातो आहे असाही आरोप त्विशाच्या घरातल्यांनी केला आहे. दरम्यान त्विशाच्या मृत्यूनंतर भोपाळमधल्या AIIMS रुग्णालयाने तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आणला आहे.

त्विशाच्या शवविच्छेदन अहवालात काय म्हटलं आहे?

भोपाळ येथील एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार त्विशाच्या मानेवर समांतर अंतरावर दोन खुणा आहेत. नायलॉनच्या बेल्टने तिचा गळा आवळला गेल्याचं दिसतं आहे. मात्र हा बेल्ट ऑटोप्सी दरम्यान AIIMS च्या वैदकीय मंडळाला दिलेला नाही. १२ मे रोजी त्विशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या नवऱ्याच्या घरी आढळला होता. त्यानंतर आता हा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्याचप्रमाणे त्विशाच्या शरीरावर बऱ्याच जखमा दिसून येत आहेत असंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Twisha Sharma Death Case news
त्विशाचं एका वकिलाशी लग्न झालं. पण अवघ्या सहा महिन्यांतच तिचा मृतदेह तिच्या सासरी आढळून आला. (फोटो-सोशल मीडिया)

त्विशाच्या कुटुंबाने काय आरोप केला आहे?

त्विशाच्या कुटुंबाने असा आरोप केला आहे की या प्रकरणात नायलॉनचा बेल्ट सादर न करण्यात आल्याने पुराव्यांशी छेडछाड झाली आहे हे दिसून येतं आहे. फॉरेन्सिक तपासणी केली जावी अशी आमची मागणी आहे. तसंच दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेम करण्यात यावं आणि ते मध्य प्रदेशच्या बाहेर करण्यात यावं असंही त्विशाच्या कुटुंबाने म्हटलं आहे. आमच्या मुलीची हत्या झाली आहे आणि पुरावा असलेला तो बेल्ट कदाचित नष्ट करण्यात आला असावा अशीही शक्यता त्विशाच्या कुटुंबाने बोलून दाखवली आहे. त्विशाची सासू निवृत्त न्यायाधीश आहे, तिचा नवरा समर्थ वकील आहे. या प्रभावामुळे अनेक लोक ‘मॅनेज’ होऊ शकतात असा आरोपही त्विशाच्या कुटुंबाने केला आहे. त्विशा शर्माचा मृतदेह तिच्या नवऱ्याच्या घरात आढळून आला. तिने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून यासंदर्भातील तपासणी सुरू आहे. तिच्या सासूला कोर्टाने जामीन दिला आहे. तर, तिचा नवरा फरार झाला आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचाही दावा त्विशाच्या वडिलांनी केला आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने हे स्पष्ट केलं आहे की त्विशाच्या नवऱ्याच्या घरातून नायलॉनचा एक पट्टा आम्ही जप्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालाच्या दरम्यान आम्ही तो डॉक्टरांना दिला नाही. एसीपी रजनीश कश्यप यांनी ही माहिती दिली. कश्यप पुढे म्हणाले की या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. आम्ही तिला जखमा कशा झाल्या होत्या याचाही शोध घेत आहोत. दरम्यान एसआयटीमध्ये असलेले पोलीस अधिकारी सुनील दुबे यांनी इंडियन एक्स्प्रेसला हे सांगितलं की त्विशाचा मृतदेह आम्ही पोलिसांनी तिच्या घरुन ताब्यात घेतला नाही.आम्ही भोपाळ एम्स रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला समजलं की तिचा मृत्यू झाला आहे. आम्ही रुग्णालयात पोहचेपर्यंत आम्हाला ही माहिती देण्यात आली की त्विशाने आत्महत्या केली आहे. त्यानंतर आमचं एक पथक हे तिच्या नवऱ्याच्या घरी गेलं. त्या ठिकाणी आम्हाला नायलॉनचा एक पट्टा सापडला आहे. व्यायाम करण्यासाठी हा पट्टा वापरला जातो. हा पट्टा आम्ही जप्त केला. पण त्यापूर्वी या ठिकाणी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली होती.

Twisha Sharma Death News
त्विशा शर्मा या विवाहितेचा लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी काय आरोप केलेत? (फोटो-ANI)

त्विशाच्या वडिलांनी समर्थवर काय आरोप केले आहेत?

त्विशा आणि समर्थ (त्विशाचा नवरा) यांची भेट डेटिंग अॅपवर झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नापूर्वी साधारण वर्षभर आधी त्विशाने आम्हाला समर्थबाबत कल्पना दिली होती. आम्हीही तिच्या लग्नाला होकार दिला. ज्यानंतर या दोघांचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर त्विशाचा नवरा समर्थ, तिची सासू गिरीबाला सिंग आणि सासरे या तिघांनीही हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ केला आणि तिला ठार केलं. हल्ली हुंडा या शब्दाला तसा काही अर्थ राहिलेला नाही. मात्र जे अनेक प्रकरणांमध्ये घडलं तसंच त्विशाच्या बाबतीही झालं. काहीतरी आर्थिक अडचण निर्माण करायची आणि पैसे उकळायचे हाच प्रकार सुरु होता. नवनिधी शर्मा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत.

त्विशाच्या माहेरच्या लोकांचे आरोप काय?

  • त्विशा तिच्या लग्नानंतर भोपाळला गेली, पण ती खुश नव्हती.
  • त्विशा आम्हाला सातत्याने घरी परतायचं आहे, मला इथे करमत नाही असं सांगत होती. पण तिला त्रास होत होता.
  • तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. नंतर तिचा मृत्यू झाल्याचाच फोन आला.
  • त्विशाचा मृतदेह आम्ही पाहिला आणि आमचा थरकाप उडाला कारण तिच्या मृतदेहावर जखमा होत्या.
  • पोलिसांनी आम्हाला अपेक्षित सहकार्य केलं नाही. तसंच महिला आयोग आणि मानवी हक्क आयोगानेही नीट सहकार्य केलं नाही.
  • त्विशाचा नवरा वकील आहे तसंच तिचे सासरे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यामुळे त्यांच्या बऱ्याच ओळखी आहेत. ज्यामुळे हे प्रकरण तिचे सासरचे लोक दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.