पश्चिम बंगालमध्ये आता टाटांसाठी पायघडय़ा!

‘आमचे टाटांशी कधीही कुठल्या प्रकारचे शत्रुत्व नव्हते, किंवा आम्ही त्यांच्याशी लढलोही नाही

राज्य सरकारची गुंतवणुकीसाठी बोलणी

कोलकाता : १३ वर्षांपूर्वी सिंगूरमधील भूसंपादन विरोधी आंदोलनामुळे टाटा उद्योगाच्या छोटय़ा मोटार प्रकल्पाला पश्चिम बंगालमधून निघून जाणे भाग पडले असतानाच, राज्यात मोठय़ा प्रमाणावरील गुंतवणुकीसाठी टाटांशी बोलणी सुरू आहेत, असे राज्याचे उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे.

रोजगार निर्मितीला तृणमूल काँग्रेस सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित करतानाच, कंपन्यांना प्रोत्साहन अनुदान त्यांच्या रोजगारनिर्मितीच्या क्षमतेवर अवलंबून राहील, असे चॅटर्जी म्हणाले. कुठल्याही बडय़ा औद्योगिक घराण्यामार्फत दोन मोठे निर्मिती उद्योग उभारले जावेत, अशी ममता बॅनर्जी सरकारची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आमचे टाटांशी कधीही कुठल्या प्रकारचे शत्रुत्व नव्हते, किंवा आम्ही त्यांच्याशी लढलोही नाही. या देशातील तसेच परदेशातीलही सर्वात आदरणीय औद्योगिक घराण्यांपैकी ते एक आहेत. सिंगूरमध्ये जो विचका झाला, त्यासाठी तुम्ही टाटांना दोष देऊ शकत नाही. समस्या डाव्या आघाडीच्या सरकारबाबत आणि त्याच्या जबरीने भूसंपादन करण्याच्या धोरणाबाबत होती. बंगालमध्ये येण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी टाटा समूहाचे नेहमीच स्वागत आहे’, असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीसही असलेले चॅटर्जी यांनी  सांगितले. टाटा समूहाने कोलकात्यात कार्यालये  थाटण्यासाठी, आणखी एक टाटा केंद्र स्थापन करण्यात रस दाखवला आहे, असेही चॅटर्जी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bengal minister offer tatas for investment zws

ताज्या बातम्या