West Bengal : कोलकाता येथील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनाला ‘नबन्ना अभियान’ अस नाव देण्यात आलं आहे. अशातच काही आंदोलकांवर सरकारद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून या विरोधात आज भाजपाकडून पश्चिम बंगाल बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथे बंददरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. तसेच २४ परगणा येथे तृणमूलच्या कार्यकर्त्याने भाजपा नेत्याच्या गाडीवर गोळीबार केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर दिनाजपूरमध्ये जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. मुर्शिदाबादमध्ये भाजपा समर्थकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने राडा झाल्याचीही माहिती आहे.
या बंद दरम्यान भाजपाचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना आपली दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं जात आहे. काही ठिकाणी मेट्रो आणि मॉल बंद करण्याचा प्रयत्नही भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, भाजपाने पुकारलेल्या या बंदला तृणमूल काँग्रसेने विरोध केला आहे. या बंददरम्यान सरकारी कार्यालयं नेहमी प्रमाणे सुरु राहतील, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच जे सरकारी कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाही ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.