पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं शाकाहराबाबतचं आवाहन धुडकावून लावलं आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी असं वक्तव्य केलं होतं की बंगाली लोकांनी दुर्गा पूजा असताना मांसाहार करु नये. ती बाब योग्य नाही. याबाबत जेव्हा पत्रकार परिषदेत समिक भट्टाचार्य यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे आवाहन धुडकावून लावत उत्तर दिलं.
समिक भट्टाचार्य नेमकं काय म्हणाले?
हे बघा बागेश्वर बाबा हे दुसऱ्या दुनियेचे व्यक्ती आहेत. त्यांचे अनेक भक्त आहेत. ते देशात प्रसिद्ध आहेत. मी पण त्यांची भेट घेतली. त्यांचा चेहरा तेजस्वी आहे. त्यांनी आमचं स्वागत केलं आणि आम्हीही त्यांचं स्वागत केलं. त्यांचे देशभरात अनेक भक्त आहेत. हे सगळं जरी असलं तरीही पश्चिम बंगालच्या लोकांनी काय खायचं आणि काय नाही ते बागेश्वर बाबा ठरवू शकत नाहीत. तो विषय त्यांचा नाही. आज अनेक लोक सांगत आहेत की शाकाहारी व्हा, व्हिगन व्हा. या गोष्टी चालत असतात. संत असल्याने त्यांनी आवाहन केलं असेल, पण कुणी काय खायचं आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न नाही. शिवाय बागेश्वर बाबा म्हणजे भाजपाचा प्रमुख वगैरे नाही किंवा अध्यक्षांचा सल्लागार नाही. कुणी काय खायचं, काय करायचं हे बंगाली माणसांना काय कुणालाच कुणी शिकवू नये. आम्हाला वाटलं आम्ही लुंगी परिधान करु, धोतर नेसायचं आहे ते नेसू. बाहेरून येणाऱ्या लोकांनी आम्हाला हे सांगू नये की आम्ही काय करायचं आहे असं समिक भट्टाचार्य म्हणाले. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
काली मातेला बकरीचं मटण नैवैद्य म्हणून दाखवलं जातं-भट्टाचार्य
समिक भट्टाचार्य असंही म्हणाले की मां कालीला बकरीच्या मांसाचा नैवैद्य दाखवला जातो. अष्टमी असते तेव्हा पुरी आणि नवमी असताना बकरीचं मांस खाण्याची पुरातन परंपरा आहे. ही सोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही बंगाली लोक तेच खाणार जे ते आत्तापर्यंत खात होते. बंगाली लोक मासे आणि मांस खाणं सोडून देणार का? असाही प्रतिप्रश्न समिक भट्टाचार्य यांनी केला.
धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले होते?
बंगाली लोक म्हणतात की आम्ही धार्मिक आहोत, पण दुर्गा पूजा सुरु असताना मांडवाच्या मागे ज्या प्रकारचं जेवण तयार होतं त्याला धार्मिक किंवा सात्विक म्हणता येणार नाही. दुर्गा पूजा असताना बंगाली लोकांनी मांसाहार करु नये असं आवाहन मी सगळ्यांना करतो. असं धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं होतं. यावरुन आता समिक भट्टाचार्यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
