Bengaluru 5 Star Hotel Food Safety Raid : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील विविध आस्थापनांवर धाडी घालून त्यांचं कार्य बंद पाडल्यानंतर आता बंगळुरूतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. बंगळुरूमधील लक्झरी हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ताज यशवंतपूर आणि शांग्री-ला सारख्या नामांकित हॉटेल्समध्ये कालबाह्य दूध, सडलेले मांस आणि बुरशी आलेला भाजीपाला सापडला आहे.’एएनआय’च्या वृत्तानुसार, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या प्रिमियम हॉटेल्सविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्व श्रेणीतील हॉटेल्सनी नियमांचं काटेकोर पालन करावं यासाठीच हे छापे टाकण्यात आल्याचं कर्नाटकचे आरोग्य मंत्री यु. टी. खादर यांनी सांगितलं.

शहरात ठिकठिकाणी तपासणी

बंगळुरू नागरी जिल्ह्यातील २६ थ्री-स्टार आणि फाईव्ह-स्टार हॉटेल्सची तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची ३० पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी सर्व बीबीएमपी झोनमधील हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या अनुपालनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान प्रयोगशाळेतील चाचणीसाठी चिकन, मटण, मासे, खाद्यतेल, दूध, मसाले, चहा पावडर, चीज, टोमॅटो सॉस आणि लिंबाचा रस यासह ३५ अन्नपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले.

हॉटेलांमध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या

अस्वच्छ स्वयंपाकघर आणि निकृष्ट साठवणूक व्यवस्था, कालबाह्य अन्नपदार्थ आणि भाज्यांवर बुरशी, चुकीचे ब्रँडिंग आणि FSSAI लेबलिंग नियमांचे उल्लंघन, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्र न ठेवणे आदी त्रुटी आढळल्या आहेत.

जप्त केलेला साठा

अधिकाऱ्यांनी नोटीस बजावत मोठ्या प्रमाणावर असुरक्षित अन्न जप्त करून नष्ट केले. द ललित अशोकमधून ७६ किलो मांस, २०० किलो भाज्या आणि ३२ लिटर कालबाह्य दूध; राडिसन ब्लू (द अत्रिया)मधून सर्वाधिक १०५ किलो कालबाह्य अन्न (चिकन, मांस, मासे आणि भाज्या); ताज यशवंतपूरमधून ७२ किलो मांस आणि मासे; फोर सीझन्समधून १९ किलो मांस; शांग्री-लामधून १५ किलो मांस; विवान्‍ता (व्हाइटफील्ड)मधून ३ किलो कालबाह्य बेकरी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागाने दिला आहे.