Bengaluru Airport Murder Case : विमानतळ हे खूप सुरक्षित ठिकाण मानलं जातं. विमानतळावर शेकडो सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. ज्यामध्ये पोलीस आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. तिथे ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनेक तपासण्यांमधून जावं लागतं. त्यामुळे विमानतळावर कोणतंही शस्त्र नेणं अशक्य असतं. मात्र, बंगळुरूच्या केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका इसमाने कुऱ्हाडीने वार करून एका तरुणाची हत्या केली आहे. या घटनेने विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचं नाव रामकृष्ण असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा तरुण विमानतळावर ट्रॉली ऑपरेटर म्हणून काम करत होता.

अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. तसेच आरोपी रमेशला घटनास्थळावरून अटक केली आहे. पोलीस सध्या रमेशची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा >> Sangeeta Thombre : भाजपा नेत्या संगीता ठोंबरेंच्या कारवर दगडफेक, चालकासह माजी आमदार जखमी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

रमेशने विमानतळावर शस्त्र कसं नेलं?

विमानतळावर घडलेल्या या घटनेने प्रवासी व विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. ईशान्य बंगळुरूचे पोलीस उपअधीक्षक म्हणाले, रमेश बेग असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने एक धारदार शस्त्र बाळगलं होतं, ते देखील आम्ही पुरावा म्हणून ताब्यात घेतलं आहे. तो बीएमटीसी बसमधून विमानतळावर दाखल झाला होता. तो बसमध्ये असल्यामुळे त्याची तपासणी (स्कॅनिंग) केली गेली नाही. बेगचं स्कॅनिंग न झाल्यामुळे तो शस्त्र घेऊन विमानतळावर पोहोचू शकला. त्यानंतर त्या समजलं की रामकृष्ण टर्मिनल १ च्या लेन १ वरील पार्किंगमधील शौचालयाजवळ आहे. त्यामुळे तो ते शस्त्र (कुऱ्हाडीसारखं शस्त्र) घेऊन शौचालयाजवळ गेला. त्याने तिथे जाऊन रामकृष्णवर वार केले. त्यात रामकृष्ण जागीच ठार झाला.

हे ही वाचा >> Sarah Rahanuma : बांगलादेशातील प्रसिद्ध टीव्ही अँकरचा मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ, मृत्यूपूर्वी केली होती ‘ती’ पोस्ट

रमेशने ही हत्या का केली?

आरोपीने पोलिसांना सांगितलं की त्याची पत्नी व मृत रामकृष्ण या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्याच रागातून रमेशने रामकृष्णची हत्या केली. पोलीस रमेशची चौकशी करत असून त्यांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.