रस्त्यावरून जाताना हेल्मेट न घालणे किती महागात पडू शकते, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार बेंगळुरूमध्ये समोर आला आहे. चालत्या दुचाकीवर अचानक झाडाची सुकलेली फांदी डोक्यावर पडल्याने ५२ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. फांदी डोक्यावर आदळताच हा माणूस क्षणात बेशुद्ध झाला आणि दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
नेमकी घटना काय?
सतीश (वय ५२ वर्ष) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास सतीश हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी अचानक रस्त्याशेजारील झाडाची एक मोठी सुकलेली फांदी थेट त्यांच्या डोक्यावर येऊन पडली. फांदीचा प्रहार इतका जोरदार होता की, सतीश यांना स्वतःला सावरण्याची अजिबात संधी मिळाली नाही. फांदी लागताच ते शुद्ध होऊन गाडीसह रस्त्यावर फेकले गेले.
हेल्मेट नसल्याने दुखापत गंभीर
या अपघाताच्या वेळी सतीश यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. डॉक्टरांच्या मते, हेल्मेट न घालण्यामुळेच त्यांच्या डोक्याला झालेली जखम अधिक गंभीर आणि जीवघेणी ठरली आहे. जर त्यांनी हेल्मेट घातले असते, तर फांदीचा थेट फटका डोक्याला बसला नसता आणि त्यांचा जीव वाचू शकला असता.
स्थानिक नागरिकांची तत्परता
सतीश रस्त्यावर कोसळताच तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी तातडीने त्यांच्या दिशेने धाव घेतली. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या सतीश यांना लोकांनी त्वरित जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती अजूनही चिंताजनक
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सतीश यांच्या डोक्याच्या गंभीर दुखापतीवर तातडीने शस्त्रक्रिया केली आहे. मात्र, शस्त्रक्रिया होऊनही त्यांची प्रकृती अजूनही अत्यंत नाजूक आहे. ते सध्या मृत्यूशी झुंज देत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर पुन्हा एकदा दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याच्या महत्त्वावर चर्चा सुरू झाली आहे. अपघात कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही, म्हणूनच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे, हेच या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
