बंगळुरूमधील इंदिरानगर परिसरात एका तरुणीला चाकूचा धाक दाखवत ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानात एकटीच काम करत असलेल्या २३ वर्षीय तरुणीचे हात फेविक्विकने चिटकवून आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या गळ्यातील सोनसाखळी लुटल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखणाऱ्या नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. परभुराज (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

दुकानात शिरताच तरुणीला चाकूचा धाक

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, डोमलूर परिसरात राहणारी जयश्री एस. ही तरुणी शनिवारी सकाळी सुमारे पावणे बारा वाजता १०० फूट रस्त्यावरील ‘प्रिमियम शू अँड बॅग रिपेअर’ या दुकानात काम करत होती. त्यावेळी हेल्मेट आणि हातमोजे घातलेला प्रभुराज दुकानात आला. त्याने काउंटरवरून उडी मारत दुकानात प्रवेश केला आणि कोणीतरी आपल्याला मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले.

तरुणी घाबरून दुकानमालकाला फोन करण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, आरोपीने तिला खाली बसवून तोंडावर हात ठेवला आणि गेल्यावर चाकू लावला. आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली, असे जयश्रीने तक्रारीत म्हटले आहे.

हातांना फेविक्विक लावून सोनसाखळी लुटली

आरोपीने तरुणीचे दोन्ही हातांवर फेविक्विक लावून ते एकमेकांना चिकटवल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिच्या गळ्यातील सुमारे ३५ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे साडेचार लाख रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. काही वेळाने जयश्रीने हात मोकळे करून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे बाहेर नागरिकांची गर्दी जमू लागली. मात्र, आरोपीने तिला केसांना धरून पुन्हा दुकानात ओढले आणि गळ्याला चाकू लावून नागरिकांना जवळ येऊ नका, अशी धमकी दिली. दुकानमालक आणि काही नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी आरोपीला पकडले

दुकानमालकावर वार केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी पळून जात असताना नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. सर्वांनी मिळून त्याला पकडून इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रम अमाथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

या घटनेत जयश्री सुरक्षित असून तिला गंभीर दुखापत झालेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपीची पार्श्वभूमी तपासली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याला मानसिक आरोग्याशी संबंधित काही अडचणी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लुटीच्या प्रयत्नादरम्यान मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.