बंगळूरू येथे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २६ जानेवारी रोजी घडलेल्या या भीषण हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सकाळी ६.५४ च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर पीडित महिलेला चेहरा आणि गळ्यावर ५० टाके पडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या मालकाची ओळख पटली असून त्याचे नाव अमरेश रेड्डी असे आहे. कुत्र्याने अचानक केलेल्या या हल्ल्यात पीडित महिलेचा चेहरा, गळा, हात, पाय इत्यादी ठिकाणी जखमा झाल्या आहेत. महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या हल्ल्यात बचावलेल्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्या महिलेला अधिकच्या वैद्यकीय उपचारांची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ५० हून अधिक टाके घालण्यात आले आहेत. ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असून डॉक्टरांकडून तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
कुत्र्याने हल्ला केला तेव्हा रस्त्यावर उभ्या एका व्यक्तीने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला देखील कुत्र्याने चावा घेतला आहे. या व्यक्तीला किती इजा झाली याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेनंतर लगेचच दोघानांही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रसासनाकडून सध्या घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचे जबाब घेतले जात आहेत. याबरोबरच घटनाक्रम निश्चित करण्यासाठी पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. कुत्र्याच्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धोका अधोरेखित झाला आहे. अनेकजण पाळीव प्राण्यांपासून इतर लोक सुरक्षित राहावेत यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि निवासी परिसरातील पाळीव प्राण्यांच्या मालकांची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

