BMTC Bus Conductor Suspended after fight with minister: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असतो. सामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे प्रवासाचे स्वस्त आणि सहज उपलब्ध करणारे साधन असते. मात्र सुट्टे पैसे, चालक-वाहकांची मुजोरी, उशिराने धावणाऱ्या बसेस यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. कर्नाटकच्या बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) बसमधून तर सुट्ट्या पैशांमुळे थेट परिवहन मंत्र्यांनाच बसमधून खाली उतरवण्यात आले होते. ज्या कंडक्टरने मंत्र्यांना उतरवले त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी हा प्रकार घडला होता. परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी तोंडाला मास्क लावून हेब्बळ बस स्टँडमधून सुटणारी २७९ई क्रमाकांची बस पकडली. ही बस केम्पेगौडा बस स्थानक ते नागशेट्टीहळ्ळी पर्यंत धावते. मंत्री सुरेश यांनी ही बस पकडून भूपासांद्रासाठी दोन तिकीटे मागितली आणि कंडक्टरला १०० रुपये दिले. मात्र कंडक्टरने सुट्टे पैसे नसल्यामुळे वाद घातला आणि त्यांना १२ रुपये देण्यास सांगितले. सुट्टे पैसे नसतील तर बसमधून खाली उतरा, असेही सांगितले.

बीएमटीसीने या वादानंतर सांगितले की, महामंडळाकडून यूपीआयवर आधारित तिकीट प्रणाली २०२४ साली अमलात आणली आहे. सध्या या प्रणालीवरून एकूण तिकीट विक्रीचा ५३ टक्के महसूल मिळत आहे. मात्र अनेक वाहक-चालक या प्रणालीची माहिती प्रवाशांना देण्यात अपयशी ठरत आहेत. मंत्र्यांशी हुज्जत घालतानाही याची माहिती दिली गेली नव्हती.

व्हिडीओ व्हायरल

बंगळूरू महानगर परिवहन महामंडळाने या वादाची माहिती देताना म्हटले की, परिवहन मंत्री सुरेश यांनी वाहक रामकृष्ण टीजी याला सुट्टे पैसे नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर रामकृष्ण टीजी हे उद्धटपणे आणि अपमानास्पद पद्धतीने बोलत राहिले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

मंत्री सुरेश यांच्यावतीने शनिवारी धडक मोहीम राबविण्यात आली होती. खरी ओळख लपवून त्यांनी विविध ठिकाणी बसमधून प्रवास केला. तब्बल दोन तास त्यांनी मास्क लावून बंगळुरूच्या जयमहाल, टीव्ही टॉवर, आरटी नगर, सीबीआय रोड, हेब्बळ, मान्यता टेक पार्क, नागस्वरा, हेन्नूर, बायराथी बांदे आणि गेड्डलाहल्ली येथे प्रवास केला.

मंत्री सुरेश यांच्याबरोबर झालेल्या गैरप्रकाराबरोबरच त्यांच्या निदर्शनास आणखी एक प्रकार आला होता. जयमहाल मार्गावरील फन वर्ल्डच्या बस थांब्यावर एक प्रवासी हात दाखवत असतानाही बस न थांबता पुढे निघून गेली. या बसच्या वाहक आणि चालकावरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र चौकशीअंती तो बस थांबा रद्द करून नवीन बस थांबा सुरू केल्याचे नंतर लक्षात आले.