Software Engineer jumps from 17th floor: फ्लॅटमध्ये पतीचा मृतदेह पाहून पत्नीने १७ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवले. दोघेही इंजिनिअर होते. बंगळुरुमध्ये सोमवारी ही घटना घडली. महिला आईला भेटण्यासाठी भेटण्यासाठी हैदराबादला गेली होती. घरी माघारी आल्यानंतर मृत पतीला पाहून तिने आत्महत्या केली आहे.
पोलिस काय म्हणाले?
भानू चंदर रेड्डी कुंता (वय ३२) आणि बीबी शाझिया सिराज (वय ३१) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. दोघेही मूळचे तेलंगणाचे असून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बंगळूरला स्थायिक झाले होते. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बंगळुरुमधील भारतीय सिटी येथे ही घटना घडली. पती भानू चंदर रेड्डी कुंता याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पतीचा मृतदेह पाहून पत्नी सिराजने देखील आत्महत्या केली असे पोलिसांनी एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
अमेरिकेतील नोकरी सुटली
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. भानू आणी बीबी यांनी नऊ वर्षापूर्वी लग्न केले होते. गेल्या एक वर्षापासून दोघेही बंगळुरु येथील अपार्टमेंटमध्ये राहत होते. बीबी सिराज एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होती तर, भानू बेरोजगार होता. भानू अमेरिकेत एका कंपनीत काम करत होता पण, त्याला कामावरुन कमी करण्यात आल्यानंतर जून २०२५ मध्ये तो भारतात माघारी आला होता.
भानूला मानसिक समस्या
भानूची पत्नी हैद्राबाद येथील एका कंपनीत काम करत होती. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी भारतीय सिटीतील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. भानू कुंता मानसिक समस्यांचा सामना करत होता, त्याच्यावर उपचार देखील सुरु होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे. सिराजने अलिकडेच बंगळुरुत एका कंपनीत नोकरी सुरु केली होती. तिच्यावर देखील कामाचा अधिक ताण होता, अशी माहिती समोर आली आहे.
फ्लॅटमध्ये आढळली चिठ्ठी
दरम्यान, पोलिसांनी घरातून एक चिठ्ठी देखील मिळाली असून, ती भानू कुंताने लिहल्याचे उघड झाले आहे. भानूने सिराजसोबत आंतरजातीय विवाह केला होता त्यामुळे त्याचे कुटुंबियांशी मर्यादीत संपर्क होता, असे चिठ्ठीत लिहले आहे.
