कर्नाटकातील बंगळुरूमध्ये घरगुती वादातून एका सिव्हिल इंजिनिअरने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने आपल्या आईला मेसेज करून आपणही आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने घरातच गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दोघांची ओळख पटली

मृतांची ओळख ३२ वर्षीय सुमंत आणि त्यांची २९ वर्षीय पत्नी पद्मावती अशी झाली आहे. सुमंत हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील असून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. पद्मावती ही हुबळी येथील असून ती सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत होती.

घरगुती वादाचे रूपांतर हिंसाचारात

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी हेग्गनहळ्ळी येथील राजेश्वरी नगरमधील त्यांच्या घरी दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर सुमंतने पद्मावतीला मारहाण केली. त्यानंतर त्याने उशीने तिचे तोंड दाबून तिला गुदमरवल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामुळे पद्मावती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना संशय आहे.

पत्नी मृत असल्याचे लक्षात येताच आईला फोन

पद्मावती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुमंतने आपल्या आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यानंतर त्याने आईला आपणही आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठवला. आईने मेसेज पाहिल्यानंतर तिने तातडीने घराच्या मालकाला याची माहिती दिली.

घर उघडल्यावर धक्कादायक दृश्य

घर उघडण्यात आल्यानंतर सुमंत हॉलमध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर पद्मावती घराच्या आतील भागात मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच राजगोपाल नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले

दोघांचे मृतदेह व्हिक्टोरिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पद्मावतीच्या मृत्यूचे नेमके कारण तसेच दोन्ही मृत्यूंच्या घटनाक्रमाबाबत शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

पोलिसांनी सांगितले की, सध्या पद्मावतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि त्यानंतर सुमंतने आत्महत्या करण्यापूर्वी काय घडले, हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.