एका ३५ वर्षीय इंजिनिअर सुनेने सासूच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. सुषमा असं मृत महिलेचं नाव आहे. ती एका टेक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. बंगळुरु या ठिकाणी ही घटना घडली आहे. सासूने तिला स्वयंपाकच करु देत नव्हती त्यामुळळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
नेमकी घटना काय? पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुषमा आणि पुनीत या दोघांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. या जोडप्याला चार वर्षांचा एक मुलगा आहे. सुषमाचा तिच्या सासूशी म्हणजेच कल्पना यांच्याशी सतत वाद होत होता. जेवण काय करायचं? यावरुन सुषमा आणि कल्पना यांच्यात वाद झाला. ज्यानंतर सुषमाने सासूच्या सततच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं. सुषमाच्या कुटुंबानेही हा आरोप केला आहे की आमच्या मुलीला तिची सासू स्वयंपाक करु देत नव्हती. तिला कायम विरोध दर्शवत असे आणि टोमणे मारत असे. सुषमाने या जाचाला कंटाळून सोमवारी गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
सुषमाच्या कुटुंबाने केला हुंडा मागितल्याचा आरोप
सुषमाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमच्याकडून पुनीतचं कुटुंब हुंडा मागत होता असाही आरोप त्यांनी आता केला आहे. सुषमाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. पण या घटनेनंतर सुषमाची सासू कल्पना घरातून निघून गेली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. कल्पना कुठे गेली याची माहिती समोर आलेली नाही.
