कर्नाटकमधील बंगळुरू शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे बंगळुरू शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बंगळुरूमध्ये असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये अचानक विजेचा प्रवाह आल्यामुळे ही घटना घडली असावी, असं संशय आहे. या दोन्ही विदेशी व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या दोन जणांनी त्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वाचवणारे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. अलेक्झांडर मॅक्सिमिलियन थिस (वय ५७, जर्मन नागरिक) आणि जुराज होर्वॅट (वय ४५, स्लोव्हाकियाचा नागरिक) अशी या मृतांची ओळख पटली आहे.
तसेच या घटनेत मॅथ्यू डिसँटिस (वय ४१, अमेरिकन नागरिक) आणि राहुल (वय २८, हॉटेलमधील कर्मचारी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनी पीडितांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यानच त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस उपायुक्त (पूर्व) विक्रम अमाथे यांनी या घटनेला दुजोरा दिला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ही घटना नेमकी कशी घडली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेनंतर हॉटेल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
