बंगळुरूतील एका तरूण उद्योजकाने मागील १८ महिन्यांमध्ये चार कोटी रूपयांचा कर भरल्याचे म्हटले आहे. भारतातल्या कर व्यवस्थेवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच २०२६ मध्ये भारतातून बाहेर पडून दुसऱ्या देशात व्यवसाय टाकण्याचे ध्येय त्याने ठेवले आहे. भारतात कर व्यवस्थेतील दोषांमुळे व होणाऱ्या त्रासामुळे व्यवसाय करणे कठीण झाल्याचे तो म्हणाला. या तरूण उद्योजकाचे नाव रोहित श्रॉफ असून तो एफ्लॉग ग्रुप (Aflog Group) चा संस्थापक आहे.
‘लिंक्डइन’वर केलेल्या पोस्टमध्ये रोहित श्रॉफ म्हणाला, “मी मागील १२ ते १८ महिन्यांत पाच लाख डॉलर म्हणजेच जवळपास चार कोटी रूपयांचा जीएसटी व आयकर भरला, तरीसुद्धा माझ्याकडे संशयास्पद दृष्टीने पाहीले जात आहे.” जे व्यवसाय, उद्योग प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्याकडे संशयाने का पाहीले जाते, असा प्रश्न रोहितने उपस्थित केला आहे. देशात फक्त पाच टक्के लोक आयकर भरतात, या लोकांनाच नेहमी लक्ष्य केले जाते, असेही तो म्हणाला.
कर गोळा करणाऱ्या संस्थांकडून वारंवार नोटीसा पाठवल्या जातात. पडताळणी केली जाते. कर भरणारे सगळ्या बाबींची पुर्तता करतात, तरीसुद्धा नेहमी त्यांनाच लक्ष्य केले जाते. स्थानिक जीएसटी अधिकारी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयकरशी संबंधित टीम वारंवार कर भरला आहे की नाही याची पडताळणी करतात. व्यवसायांना दर महिन्याचा जीएसटी, टीडीएस आणि वार्षिक आयकर भरण्यासाठी सतत टीम नेमावी लागते. सगळ्या बाबींची पूर्तता करावी लागते, असे रोहितने म्हटले आहे.
“व्यवस्थेला विरोध करण्यापेक्षा टॅक्स भरणे सोपे”
रोहित पुढे म्हणाला, व्यवस्थेकडून व्यवसायांना कोणताच लाभ मिळत नाही, तरीही कर भरण्याची किचकट प्रक्रिया व्यावसायिक पूर्ण करतात. जर एवढं सगळं करूनही व्यावसायिकांना काही लाभच मिळत नसेल तर हे सगळं करून काय साध्य होणार आहे? असा प्रश्न रोहितने विचारला आहे. तसेच व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते, त्यापेक्षा कर भरून शांत बसणे अधिक सोपे आहे म्हणून बरेच उद्योजक कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.
“२०२६ मध्ये भारतातून बाहेर पडणे हेच ध्येय”
कर भरणाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने त्यांच्याकडे राजकीय दृष्टीने पाहीले जात नाही. त्यामुळे त्यांचा विचारही केला जात नाही. कर भरणाऱ्या लोकांचे राजकीय महत्व खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्यावर टॅक्सचे अधिक ओझे टाकणे अत्यंत सोपे आहे, असे रोहीत म्हणाला. नवे वर्ष २०२६ मध्ये भारतातून बाहेर पडून दुसरीकडे व्यवसाय सुरू करण्याचे ध्येय ठेवल्याचे रोहित म्हणाला. “२०२६ साठी ठेवलेले ध्येय खूप सोपे आहे, देशातून बाहेर पडणे आणि तिकडे व्यवसाय उभा करणे. हे सांगताना दु:ख वाटतेय. कारण व्यवस्थेमध्ये दोष आहे.”
