Bengaluru Grindr date robbery news : बंगळुरूमधील एका व्यक्तीने एका लोकप्रिय समलैंगिक डेटिंग ॲपद्वारे ओळख झालेल्या एका व्यक्तीला अपार्टमेंटमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र, ही भेट संस्मरणीय ठरण्याऐवजी, त्या व्यक्तीची त्याच्या ‘डेट’ने आणि साथीदाराने मिळून सुमारे २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून फसवणूक केली. हे दोन्ही आरोपी तृतीयपंथी आहेत. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी पश्चिम बेंगळुरूमधील चंद्रा लेआउट भागात घडली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गे ॲपवर साधला संवाद

त्या व्यक्तीने ‘ग्रिंडर’ (Grindr) या डेटिंग ॲपच्या माध्यमातून एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. त्याचा मित्र आणि त्याचे कुटुंब एका सहलीसाठी बाहेर गेले असल्याने, त्याने या ‘डेट’ला मित्राच्या रिकाम्या अपार्टमेंटमध्ये बोलावलं. मात्र, घरात आलेल्या व्यक्तीने चेहऱ्यावरील मास्क काढताच ती व्यक्ती तृतीयपंथी असल्याचं समजल्याने त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला.

यानंतर अवघ्या १० मिनिटांत आणखी एक तृतीयपंथी व्यक्ती त्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. या दोघांनी मिळून त्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवला, त्याला धमकावले आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून तेथून पळ काढला. पोलीस तक्रारीनुसार, अपार्टमेंटचा मालक आणि त्यांची पत्नी शहराबाहेर गेले होते आणि त्यांनी घराच्या चाव्या या व्यक्तीकडे दिल्या होत्या, जो त्या निवासस्थानी थांबला होता.

याच काळात त्याने डेटिंग ॲपद्वारे एका व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्याला घरी बोलावले. घरात आलेल्या व्यक्तीने आणि त्याच्या मित्राने बेडरुमचा दरवाजा आणि सोन्याचे दागिने असलेले कपाट तोडून सुमारे २० लाख रुपये किमतीचे २२६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून पळ काढला.

या चोरीची माहिती मिळताच घरमालक बेंगळुरूला परतला आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी नाझिया आणि सय्यद मौशिन या दोन आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे. अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.