Bengaluru road accident 7 killed: बंगळुरु येथे दोन कार, दुचाकी आणि आयशरच्या झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. होस्कोट तालुक्यातील सत्यवारा गावाजवळ आज (१३ फेब्रुवारी) पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यात अपघातग्रस्त दोन्ही कारचा चक्काचूर झाला असून, आयशर पलटी झाला, दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
सात जणांचा मृत्यू
दोब्बासपेट-होस्कोट सॅटेलाइट टाउन रिंग रोड (STRR) वर झालेल्या या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. यात कारमधील सहाजण आणि दुचाकीवरील एकाचा समावेश आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने आणखी एक कार आणि आयशरही अपघातग्रस्त झाले.
कारचा चक्काचूर, आयशर पलटी
एक कार होस्कोट येथून देवणाहळीच्या दिशेने जात होती. भरधाव कारने पहिल्यांदा दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार आयशर ट्रकला धडकली. यामुळे दुसरी एक कार अपघाग्रस्त झाली. काही क्षणात अनेक वाहने वेगाने धडकल्याने कारचा चक्काचूर झाला तर आयशर ट्रक पलटी झाली. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
पोलिस घटनास्थळी दाखल
अपघातानंतर पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. मृतांना बाहेर काढून मृतदेह होस्कोट रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
