मोबाईल फोनच्या वापरावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी रात्री बंगळुरूमध्ये विभूतीपुरा परिसरात हा प्रकार घडला असून या घटनेत दोघांचेही मृत्यू झाले. मृतांची ओळख राघवेंद्र आणि त्यांची पत्नी श्रुती अशी झाली आहे. राघवेंद्र ऑटोरिक्षा चालवत होते, तर श्रुती घरकाम करत होत्या. हा प्रकार एचएएल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
मोबाईलवरून सुरू झालेला वाद टोकाला
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री राघवेंद्र घरी परतल्यानंतर त्यांचा पत्नीशी वाद झाला. त्यावेळी ते दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. घरी आल्यानंतर श्रुती मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे पाहून ते संतापले आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर राघवेंद्र यांनी श्रुतीवर बीअरच्या बाटलीने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने घेतला गळफास
श्रुती यांचा मृत्यू झाल्यानंतर राघवेंद्र यांनी त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एचएएल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र नेमक्या कोणत्या क्रमाने घटना घडल्या आणि या दोघांच्या मृत्यूमागील परिस्थिती काय होती, याचा तपास अद्याप सुरू आहे.
दोघांमध्ये यापूर्वीही होते वाद
राघवेंद्र हे श्रुती स्वयंपाक करत नसल्याची आणि मोबाईलवर बराच वेळ घालवत असल्याची तक्रार करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, श्रुती यांनी पतीला दारूचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील वाद वाढल्यानंतर दोघे पोलिस ठाण्यातही गेले होते.
१७ वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह
राघवेंद्र आणि श्रुती हे मूळचे दावणगेरे येथील रहिवासी होते. प्रेमसंबंधानंतर दोघांनी कुटुंबीयांची समजूत काढून सुमारे १७ वर्षांपूर्वी लग्न केले होते. विवाहानंतर त्यांनी विभूतीपुरा येथे घर घेतले आणि तेथेच स्थायिक झाले. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. सध्या दोन्ही मुले दावणगेरे येथे श्रुती यांच्या आई-वडिलांकडे राहत आहेत. राघवेंद्र यांचे आई-वडीलही याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत असल्याची माहिती आहे.
एचएएल पोलिसांकडून तपास सुरू
एचएएल पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दाम्पत्यातील अलीकडील वाद, यापूर्वी पोलिस ठाण्यात झालेली भेट आणि मंगळवारी रात्री नेमके काय घडले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
