बंगळुरूमध्ये मंगळवारी ईडीकडून आयसिस कनेक्शनसंबंधी आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. सकाळी सुरू झालेला हा तपास अजून सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या एफआयआरच्या आधारे नोंदवलेल्या एनफोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात इकरा वेल्फेअर ट्रस्ट, गाइडन्स फॉर मॅनकाइंड आणि इतर व्यक्तींवर आयसिससाठी भरती केल्याचे आरोप आहेत.

राष्ट्रीय तपास संस्थेने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या कलम १७ (दहशतवादासाठी निधी उभारणे), १८ (दहशतवादासाठी पूर्वतयारीची कृती) आणि १८-बी (दहशतवादासाठी व्यक्तींची भरती) अन्वये एफआयआर दाखल केली.

एएनआयच्या वृत्तानुसार याप्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने आरोपपत्र दाखल केले ज्यामध्ये इरफान नासिर, अहमद अब्दुल कादर, मोहम्मद तौकीर महमूद, जुहाब हमीद शकील मन्ना आणि मोहम्मद शिहाब यांची आरोपी म्हणून नावे नमूद करण्यात आली आहेत.

आरोपपत्रानुसार, हे सर्व आरोपी बंदी घालण्यात आलेल्या आयसिस/आयएसआयएल/दाएश या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. त्यांनी बंगळुरूमधील मुस्लिम तरुणांना कट्टरतावादी विचारांकडे वळवले व त्यांची इसिसमध्ये भरती करण्याचा कट रचल्याचा दावा एनआयएने केला आहे.

आरोपींनी इक्रा कॅम्प नावाच्या मुस्लिम व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आणि त्यातून सुरू करण्यात आलेल्या कुराण सर्कल या साप्ताहिक अभ्यासगटातून तरुणांशी संपर्क साधला. तसेच आरोपींनी निधी गोळा करून तरुणांना तुर्कीमार्गे सीरियात बेकायदेशीरपणे पाठवण्यात आले, जेणेकरून ते आयसिसमध्ये सामील होऊन सीरियन सरकारविरोधात लढू शकतील, असा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी असाही आरोप केला की, सीएए-एनआरसीविरोधातील आंदोलनाशी संबंधित मुस्लिम समाजातील भावना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयसिसची विचारसरणी पसरवण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी विविध व्यक्ती, ट्रस्ट तसेच स्वतःच्या बचतीतून निधी जमा केला. हा पैसा मुस्लिम तरुणांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यासाठी आणि त्यांना आयसिसच्या बाजूने लढण्यासाठी मदत करण्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.