Bengaluru IT Couple Suicide after AI Job Loss and financial instability details : बेंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुण जोडप्याने आत्महत्त्या केल्याची धक्कादायक प्रकार घडला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर, या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ज्यानुसार मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणींमुळे या जोडप्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.

तेलंगणा येथील ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर बानू चंद्रा रेड्डी यांनी सोमवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर काही वेळातच, आयबीएम कंपनीत काम करणारी त्यांची पत्नी बिबी शाझिया सिराज यांनी देखील इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले.

अमेरिकेतील नोकरी गमावल्यानंतर रेड्डी हे वर्षभरापासून बंगळुरूमध्ये स्थिर नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांना एआयमुळे झालेल्या नोकरी कपातीचा फटका बसला होता, ज्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्थिर साधन उरले नव्हते.

खूप दिवस बेरोजगार राहिल्यामुळे ते जास्तच आर्थिक संकटात अडकत गेले. यामुळे आधीपासूनच संघर्ष करत असलेल्या रेड्डी यांच्यावर मानसिक तणाव वाढत गेला.

शाझिया यांच्याबरोबर केलेला आंतरधर्मीय विवाह रेड्डी यांच्या कुटुंबाला मान्य नव्हता. त्यामुळे त्यांना या आर्थिक अडचणीच्या काळात कौटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही, यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये राजकीय क्षेत्रात चांगली ओळख असलेल्या रेड्डी यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे रेड्डी यांचे त्यांच्या कुटुंबाबरोबरचे संबंध हे चांगलेच ताणले गेलेले होते. कुटुंबाचे भावनिक आणि आर्थिक पाठबळ नसल्याने, हे जोडपे बंगळुरू येथे वैयक्तिक अडचणींचा सामना करत जगत होते.

दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये रेड्डी यांनी या काही कारणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या निर्णयाला आपणच जबाबदार असून, आपल्या आत्महत्येसाठी पत्नीला दोष देऊ नये, असे या चिठ्ठीत लिहिले होते.

ही घटना घडण्याच्या काही काळापूर्वीच शझिया या बंगळुरू येथे परतल्या होत्या. त्यांनी आपल्या पतीचा मृतदेह पाहिलानंतर स्वतःही टोकाचा निर्णय घेतला. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.