Bengaluru Crime News: बेंगळुरूच्या येलहंका भागातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कचरा साफ करताना बेंगळुरू महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या पिशवीत एका नवजात बाळाचा मृतदेह आढळला. तक्रारीनुसार, २ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास, गांधीनगरमधील सेकंड क्रॉस रोडवरील कचऱ्याच्या कुंडींत एक नवजात बाळ आढळून आले. नवजात बाळाचा मृतदेह आढळताच, या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत तातडीने कळवले. यानंतर येलहंका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत, बाळाला सरकारी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी बाळाची तपासणी केल्यानंतर बाळ मृत असल्याचे घोषित केले.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये एक वृद्ध माणूस मोठी कचऱ्याची पिशवी ठेवलेली सायकल ढकलत असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतली. या व्यक्तीची चोकशी केल्यानंतर, त्याने सांगितले की, त्याला शेजराच्या एका तरुणीने ही कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत टाकायची विनंती केली होती. त्याला या पिशवीत बाळाचा मृतदेह असल्याचे कल्पना नव्हती.
बाळाचा मृतदेह असलेली पिशवी टाकलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विनुथा नावाच्या तरुणीला शोधून काढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे भरत (२२) नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधातून एक मुलागा जन्माला आला होता. गर्भधारणा आणि बाळंतपण गुप्त ठेवण्यासाठी या तरुणीने घरीच प्रसूती करण्यासाठी मित्रांची मदत घेतल्याचे वृत्त आहे. बाळंतपणावेळी झालेल्या गुंतागुंतीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. याबाबत बँगलोर मिररने वृत्त दिले आहे.
ही घटना लपवण्यासाठी, तरुणीने बाळाला कचऱ्याच्या पिशवीत गुंडाळले आणि ती पिशवी एका वृद्ध व्यक्तीला दिली. यानंतर त्याने नकळत बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. तरुणीच्या जबाबानंतर, पोलिसांनी ऑटो-रिक्षा चालक असलेल्या तिच्या प्रियकराचा शोध घेतला आणि अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या जबाबातून हे प्रकरण स्पष्ट झाल्यानंतर पिशवी फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसंनी सोडून दिले आहे.