Bengaluru Family Suicide Case : बेंगळुरूच्या उपनगरात आर्थिक कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोघांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आशा (५५) आणि त्यांची मुलगी वर्षिता (३४) अशी मृतांची नावे असून, त्यांचा जागीच मृत्यू झाला. वर्षिताचा भाऊ मोहन गौडा (३२) आणि तिचा ११ वर्षांचा मुलगा मयंक हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये आर्थिक कर्जाच्या विळख्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते. हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्यात आला होता.
नेमकं काय घडलं?
व्हिडिओ मिळाल्यावर नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले. घराचे दरवाजे आतून बंद असल्याने त्यांनी मागच्या बाजूने प्रवेश केला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बेंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत एम.व्ही. यांनी सांगितलं की, सुरुवातीला मोहन गौडा याने वर्षिता आणि आशा यांचा गळा चिरला. त्यानंतर भाचा मयंक याची हत्या करून स्वतःचाही गळा चिरण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशा आणि वर्षिता यांचा जागीच मृत्यू झाला असून मोहन आणि मयंक गंभीर जखमी आहेत. प्राथमिक तपासानुसार प्रचंड कर्ज हेच या घटनेमागचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. मोहन हा ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या चिटफंड व्यवसायात गुंतलेला होता.
पोलिसांनी पुढे सांगितले की, तो सणासुदीच्या काळात विविध चिटफंड योजना चालवत असे. यासोबतच त्याच्या विलासी जीवनशैलीमुळे कर्जाचा डोंगर साचला होता. कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने या कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
