भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना बंगळुरू पोलिसांनी समन्स बजावला आहे. भाजपा कर्नाटक युनिटने केलेल्या ‘आक्षेपार्ह पोस्ट’बद्दल बेंगळुरू पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली आहे.

जेपी नड्डा आणि अमित मालवीय यांना या व्हिडिओच्या संदर्भात बेंगळुरू पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मायक्रो-ब्लॉगिंग साइट एक्सला भाजपाच्या कर्नाटक युनिटने शेअर केलेली पोस्ट ताबडतोब काढून टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर, पोलिसांनीही कारवाई केली.

भाजपा कर्नाटक खात्याकडून कायदेशीर चौकटीचे उल्लंघन करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने सायबर विभागाला ही पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. परंतु, तरीही ही पोस्ट काढून टाकण्यात आलेली नाही.

कर्नाटक भाजपाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एससी, एसटी आणि ओबीसींच्या तुलनेत मुस्लिमांना मोठा निधी देत ​​असल्याचे दाखवले आहे. ही पोस्ट वादग्रस्त ठरल्याने त्यांच्यावर काँग्रेसने याविरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार, जे. पी. नड्डांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.