Bengaluru Pub Food Safety Raid : बंगळुरूमधील एका नामांकित पबमध्ये अन्न सुरक्षा तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कुजलेलं अन्न, अयोग्य पद्धतीने साठवलेले पदार्थ आणि इतर नियमांचं उल्लंघन आढळल्याने पब बंद करण्यात आला आहे. तसंच इतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांमध्ये बुरशी आलेले मांस, खाण्यायोग्य नसलेले सॉस आणि मुदत संपलेले दुग्धजन्य पदार्थ, मासे, अळिंबी (मशरूम) आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बुरशीयुक्त मटण

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने बंगळुरू शहर जिल्हा आणि बीबीएमपी झोनमधील अन्न साठवणूक केंद्रे आणि खाद्य व्यवसाय प्रतिष्ठानांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल १३२ किलो अन्नपदार्थ (७० किलो सोया सॉससह) आणि १५ लीटर वापरलेले खाद्यतेल जप्त केलं आहे. यूबी सिटी या लक्झरी मॉलमधील स्काय लाउंज या पबचे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ स्थितीत आढळल्याने अधिकार्‍यांनी ते बंद करण्याचे आदेश दिले. स्वयंपाकघरात कुजलेले चिकन आढळले, ज्यावर बुरशी आली होती. अधिकार्‍यांना तेथे १० दिवस मुदत संपलेले दूध आणि दही देखील आढळले. या आवारातील एकूण ५१ किलो अन्नपदार्थ खाण्यास अयोग्य आढळल्याने ते नष्ट करण्यात आले; यामध्ये ४५ किलो कुजलेलं चिकन व बीफ आणि ६ किलो व्हेजिटेबल कटलेटचा समावेश होता. याशिवाय, १५ लीटर वापरलेले खाद्यतेलही फेकून देण्यात आले.

अन्य हॉटेल्समधूनही अन्नपदार्थ जप्त

तपासणीदरम्यान इतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. ‘रॉयल चेन हॉटेल’मधून अधिकार्‍यांनी ५० किलो बदकाचे मांस आणि ५ किलो मासे असे एकूण ५५ किलो पदार्थ जप्त केले. ‘मद्रास किचन’मधून ५ किलो हिरवे वाटाणे, तर ‘टेस्कॉन हॉटेल’मधून ५ किलो मशरूम जप्त करण्यात आले. ‘सँचेझ हॉटेल’मधून ३ किलो मासे जप्त करण्यात आले, तर केक, बटाटे आणि टाकोससह इतर ७ किलो अन्नपदार्थ फेकून देण्यात आले.

बेंगळुरूमधील अनेक नामांकित हॉटेल्सना अन्नपदार्थांचा पुरवठा करणारी कोल्डमॅन लॉजिस्टिक्स आणि राधाकृष्ण फूडलँड संचलित अन्न साठवणूक आणि वितरण केंद्रांचीही तपासणी करण्यात आली. या सुविधांच्या तपासणीदरम्यान, मुदत संपत आलेला सुमारे ७० किलो सोया सॉस आणि इतर विविध सॉस जप्त करण्यात आले, अशी माहिती विभागाने दिली. तपासणी पथकांनी विश्लेषणासाठी मांसाचे ५ नमुने आणि इतर १३ खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याशिवाय, स्ट्रॉबेरी-फ्लेवरची पेये आणि मुदत संपत आलेली इतर पेयांसह सुमारे १० लीटर पेये जप्त करण्यात आली.

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने बंगळुरू शहर जिल्हा आणि बीबीएमपी झोनमधील खाद्य व्यवसाय चालकांच्या अन्न साठवणूक केंद्रांची तपासणी करण्यासाठी सुरू केलेल्या व्यापक विशेष मोहिमेचा हा एक भाग होता. या मोहिमेसाठी विभागाने नियुक्त अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ३० पथके तयार केली होती. ८ ऑगस्ट रोजी या पथकांनी बंगळुरूच्या विविध भागांतील अन्न साठवणूक केंद्रांची तपासणी केली, जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल्स आणि इतर केटरर्सना अन्नसाहित्य, मटण आणि मासे पुरवतात. या सुविधांमधील साठवणुकीची स्थिती, अन्नपदार्थांचा दर्जा आणि पाळण्यात येणारे सुरक्षा उपाय यांची पथकांनी तपासणी केली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.