Muslim Student Terrorist Remark: बंगळुरूच्या पीईएस विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गात प्राध्यापक शिकवत असताना एका मुस्लीम विद्यार्थ्याला उद्देशून कथितरित्या जातीयवादी आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून विद्यापीठाने सदर प्राध्यापकाला निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे. वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या विधानाचा व्हिडीओ गुपचूप चित्रित केला. त्यानंतर आता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यांच्या विधानावर टीका होत आहे.

प्रकरण काय आहे?

सदर घटना पीईएस विद्यापीठात २४ मार्च रोजी घडली. प्राध्यापक मुरलीधर देशपांडे वर्गात शिकवत असताना अफान नावाच्या विद्यार्थ्याने वर्गाबाहेर जाण्याची परवानगी मागितली. यावेळी प्राध्यापक देशपांडे यांचा पारा चढला.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्याला सुनावताना म्हटले, “तुला लाज वाटत नाही का? मला वाटले होते आज मी खूप शांत राहीन.” यानंतर काही सेकंद थांबून प्राध्यापकांनी सदर विद्यार्थ्याला ‘दहशतवादी’ असे म्हटल्याचे व्हिडीओत ऐकू येत आहे. मात्र व्हिडीओदरम्यान बराच गोंगाटही ऐकू येतो.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, वर्गात त्यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी आरोप केला की, प्राध्यापकांनी इराण युद्धाला त्याच्यासारख्या लोकांना जबाबदार धरले.

पाहा व्हिडीओ

या घटनेनंतर मोठा वाद उद्भवला आहे. काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाची भेट घेऊन या घटनेप्रकरणी कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या रोषानंतर विद्यापीठाने प्राध्यापक देशपांडे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.

पीईएस विद्यापीठाचे कुलपती जवाहर दोरेस्वामी या कारवाईबद्दल बोलताना म्हणाले की, संस्थेने व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आणि घटनेच्या सभोवतालच्या परिस्थितीची तपासणी करण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. “आमच्या विद्यापीठातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आम्ही आमच्या तांत्रिक टीककडून व्हिडिओची सत्यता पडताळण्यास सांगितले आहे. आम्ही संबंधित प्राध्यापकाला तात्काळ निलंबित केले असून, व्यवस्थापनाची शिस्तपालन समिती पुराव्यांची तपासणी करेल,” असे दोरेस्वामी म्हणाले.