चोरी झालेल्या मोबाईलची तक्रार दाखल करण्यास सांगितल्यानंतरही तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही, असा आरोप करत एका व्यक्तीने बंगळुरू शहर रेल्वे पोलिस ठाण्यात २८ वर्षीय महिला कॉन्स्टेबलवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गजेंद्र नावाच्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजता घडली. त्यावेळी कॉन्स्टेबल शिल्पा या ठाण्यात एकट्याच ड्युटीवर होत्या. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
मोबाईल चोरीची तक्रार घेण्यासाठी आला होता
प्राथमिक तपासानुसार, गजेंद्र आपला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. मात्र त्यावेळी इतर पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने शिल्पा यांनी त्याला नंतर पुन्हा येण्यास सांगितले, अशी माहिती आहे. त्यानंतर तो ठाण्यातून निघून गेला, मात्र काही वेळातच पुन्हा परतला. त्याने ठाण्यात प्रवेश करून शिल्पा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने बॅरिकेडच्या चाकाला जोडलेला लोखंडी रॉड काढून शिल्पा यांच्या डोक्यावर वार केले.
‘तक्रार का घेतली नाही?’ म्हणत सात वेळा डोक्यात वार
शिल्पा यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि आपली तक्रार का घेतली नाही, असा जाब विचारला. त्यानंतर त्याने त्यांच्या डोक्यावर सहा ते सात वेळा लोखंडी रॉडने वार केल्याचे त्यांनी सांगितले. हल्ल्यानंतर आरोपी रॉड घटनास्थळीच सोडून तेथून फरार झाला. जखमी शिल्पा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून २३ टाके घालावे लागले आहेत.
गर्भवती असून त्यांनी वारंवार रात्रीची ड्युटी
शिल्पा दोन महिन्यांच्या गर्भवती असून त्यांनी वारंवार दिवसाच्या शिफ्टमध्ये ड्युटी देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांना रात्रीच्या वेळी सेंट्री ड्युटीवर तैनात करण्यात आल्याचा आरोप शिल्पा यांचा भाऊ कृष्ण नायक यांनी केला.
सब-इन्स्पेक्टर नटराज आणि सर्कल इन्स्पेक्टर कांताराज हे ड्युटीचे नियोजन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही कर्मचाऱ्यांना दिवसाची ड्युटी देऊन इतरांवर अन्याय केला जात असल्याचे तसेच कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र पोलीस अधिकाऱ्यांवरील हे आरोप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत.
रेल्वे पोलिसांकडून हल्ल्याचा तपास सुरू असून आरोपीचा हल्ल्यामागील नेमका हेतू आणि त्यावेळी ठाण्यातील ड्युटीची व्यवस्था यांचाही तपास केला जात आहे.
