Bengaluru software engineers kidnapping case : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये दोन २३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचं अपहरण झाल्याची घटना समोर आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या सहा तासांत दोघांची सुटका केली; मात्र, त्यानंतर या दोघांनाही बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एका २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या इंजिनिअर्सपैकी एकावर आहे. दुसऱ्या तरुणाने या कथित अत्याचारात मदत केल्याचा आरोप आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एप्रेसने दिले आहे.

दरम्यान, या दोघांचं अपहरण करून त्यांच्यापैकी एकाच्या वडिलांकडून खंडणी उकळण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली तरुणीसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणामागे २४ ऑक्टोबर रोजी घडल्याचा आरोप असलेला लैंगिक अत्याचार आणि त्यातून निर्माण झालेला वाद असल्याचं सांगितलं जात आहे.

तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप

बी. महेंद्र आणि तरुण अशी या दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची नावं आहेत. महेंद्रवर तरुणच्या २१ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे कथित कृत्य ते राहत असलेल्या घरात घडलं. त्यावेळी तरुणने पीडितेला एका खोलीत डांबून ठेवलं आणि महेंद्रला मदत केली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेनंतर तरुणी आणि तिच्या प्रियकराच्या साथीदारांनी दोन्ही इंजिनिअर्सचं अपहरण करण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. या दोघांना ताब्यात घेऊन महेंद्रच्या वडिलांकडून खंडणी मागण्याची योजना आखण्यात आल्याचंही तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पहाटे अपहरण, सहा तासांत पोलिसांची कारवाई

महेंद्रचे वडील बी. रमणा यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. ते आंध्र प्रदेशातील मदनपल्ले येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा महेंद्र आणि त्याचा मित्र तरुण यांचं बुधवारी पहाटे २.५० ते सकाळी ६ या वेळेत बंगळुरूमधील त्यांच्या घरांमधून अपहरण करण्यात आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. या कारवाईत २१ वर्षीय तरुणीसह ११ जणांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दोन्ही इंजिनिअर्सचं अपहरण करून महेंद्रच्या वडिलांकडून खंडणी उकळण्याचा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

अपहरणकर्त्यांना अटक; त्यानंतर दोन्ही इंजिनिअर्सही गजाआड

अपहरणाच्या प्रकरणात दोन्ही तरुणांची सुटका केल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीचा जबाब नोंदवला. त्यानंतर महेंद्र आणि तरुण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ११ जणांमध्ये राजकुमार (२४), मंजुनाथ (२३), लोकनाथ (२२), सुहेल (२२), नरेंद्र रेड्डी (२२), शिवा सुब्रमण्यम (२४), सलीम पाशा (३०), नईम पाशा (३१), शहबाज (२६), राजेश (२०) आणि २१ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. या सर्व आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असून, पुढील तपासासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अपहरण आणि बलात्काराच्या या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून, संबंधित आरोप न्यायालयात सिद्ध होणं अद्याप बाकी आहे.