बंगळुरूमध्ये सहा वर्षांपासून नात्यात असलेल्या जोडप्यात झालेल्या वादानंतर २३ वर्षीय तरुणीने सातव्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना घडली. या वेळी तिने सोबत असलेल्या ३० वर्षीय प्रियकरालाही खाली ओढल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बंगळुरूतील व्हाइटफिल्ड परिसरातील सहनिवासाच्या इमारतीत रविवारी घडली. मृत महिलेचे नाव जननी असून ती सॉफ्टवेअर अभियंता होती. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
जननी जानेवारी २०२६ पासून व्हाइटफिल्ड येथील सहनिवासाच्या इमारतीत राहत होती. तिचा साथीदार माणिकवेलू हा एका मालवाहतूक कंपनीत काम करतो. दोघेही मूळचे पुदुच्चेरी, तमिळनाडू येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मणिचावेलूचे अलीकडेच दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरले होते. रविवारी सकाळी जननी आणि माणिकवेलू यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघे इमारतीच्या गच्चीवर गेले. दुपारी सुमारे सव्वाबारा वाजता जननीने सातव्या मजल्यावरून उडी घेतली. उडी मारताना तिने माणिकवेलूलाही बरोबर ओढले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.
जननी खाली पडताच तिचा जागीच मृत्यू झाला. मात्र माणिकवेलू झाडाच्या फांद्यांवर पडल्याने त्याचा वेग काही प्रमाणात कमी झाला आणि त्यानंतर तो जमिनीवर आदळला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने व्हाइटफिल्ड येथील वैदेही वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
जननीचा मात्र घटनास्थळीच मृत्यू झाला.जननीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली होती आणि त्या वेळी माणिकवेलूला सोबत ओढले का, याचा पोलिस तपास करत आहेत. वादाचे नेमके कारण काय होते, तसेच उडी घेण्यापूर्वी दोघांमध्ये काय घडले, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिस साक्षीदार आणि त्यांच्या परिचितांची चौकशी करत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.
