Bengaluru Techie Kills Girlfriend: कर्नाटक पोलिसांनी सोमवारी एका विवाहित महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. मृत महिला विवाहित असून पतीला विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी सदर संबंध संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २५ वर्षीय प्रियकराला पीडितेचा निर्णय मान्य नव्हता. त्यातून झालेल्या भांडणात हा गुन्हा घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत महिलेचे नाव हरिनी आर. (३३) असून त्या कर्नाटकमधील केंगेरी येथील रहिवासी होत्या. ६ आणि ७ जूनच्या मध्यरात्री उत्तरहळ्ळी येथील एमरा गॅलेक्सी जीएम रॉयल्स ओयो लॉजमधील एका खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. आरोपीचे नाव यशस असून तोही केंगेरी येथील रहिवासी आहे. बीसीए पदवीधर असलेला यशस बंगळुरूत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हरिनी यांच्या पतीला दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे हरिनी यांनी हे नाते संपुष्टात आणण्याचा विषय यशससमोर काढला. यशसला सदर निर्णय मान्य नव्हता. त्यामुळेच ओयोमध्ये भेटायला आला असताना यशसने स्वतःबरोबर धारदार शस्त्र आणले होते. भांडणानंतर त्याने पीडितेवर १२ वेळा वार केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

या भांडणात यशसच्याही शरीरावर चाकूच्या जखमा झाल्या होत्या. तो रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. हरिनी यांच्या हत्येनंतर ही आत्महत्या असल्याचा बनाव करण्यासाठी यशसने स्वतःच्या शरीरावर वार करून घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले. ८ जून रोजी डॉक्टरांनी डिस्चार्ज देताच पोलिसांनी त्याला अटक केली.

हरिनी यांचा २०१२ साली शेतकरी असलेल्या दासगौडा (४१) यांच्याशी विवाह झाला होता. तीन वर्षांपूर्वी हरिनी आणि यशस यांची फेसबुकवरून ओळख झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर मागच्या सहा महिन्यांपासून त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते. मात्र पतीला संशंय येऊ लागल्यामुळे हरिनी यांनी यशसला टाळण्यास सुरुवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ जून रोजी या विषयावर चर्चा करण्यासाठी हरिनी आणि यशस हे लॉजवर आले होते. दासगौडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हरिनी गेल्या काही काळापासून यशसची सतत फोनवर बोलत होती. याची माहिती दासगौडा यांनी हरिनी यांच्या माहेरच्या मंडळींना दिली होती. हरिनी यांना कुटुंबियांनी समज देऊनही त्यांनी यशसची संपर्क कायम ठेवला होता.