Bengaluru missing girl OTP traced full details : आई-वडील प्रेमाने वागत नाहीत, बहिणीवरच जास्त प्रेम करतात, अशी धारणा झाल्याने दोन मुलींनी घर सोडलं. कॉलेजला जाते असं सांगून त्या घरातून निघाल्या, पण घरी परतल्याच नाहीत. त्यांच्याकडे ना फोन होता आणि नाही कोणतंही कार्ड. पण अशाही परिस्थितीत सीआयडी पोलिसांनी त्यातील एकीचा माग काढला अन् तिला तिच्या पालकांकडे सुपूर्त केलं. याकरता एका ओटीपीने तपासकर्त्यांना मदत केली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जानेवारी महिन्यात बेंगळुरूमधील एका १८ वर्षीय मुलीने एका मैत्रिणीसोबत कॉलेजला जात असल्याचं सांगून घर सोडलं. पण ती सात महिने घरी परतलीच नाही. सात महिन्यानंतर तिची भेट झाली तेव्हा ती गरोदर होती. ३१ जानेवारी रोजी बंगळुरूच्या विद्यारण्यपुरा येथून बेपत्ता झालेल्या तनिष्काला गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाटक उच्च न्यायालयासमोर हजर केले. तनिष्काच्या पालकांनी दाखल केलेल्या ‘हेबिअस कॉर्पस’ याचिकेनंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आता विवाहित असून गरोदर आहे.

पोलिसांचे १० तपास अन् सीआयडीकडे प्रकरण सोपवलं

विद्यारण्यपुरा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. १० सदस्यांच्या एका पथकाने मुंबई, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, वाराणसी, केरळ, चामराजनगर आणि म्हैसूरसह १०० हून अधिक ठिकाणी या मुलींचा शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. तपासात काहीही यश न आल्याने मुलींच्या पालकांनी उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने एप्रिलमध्ये हा तपास सीआयडीकडे वर्ग केला, ज्यानंतर या संस्थेने पुढील तपास सुरू ठेवला.

घरातून दुर्लक्षित?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्काने सांगितलं की तिला तिच्या घरात नेहमी दुर्लक्षित वाटायचं. तिने आरोप केला की तिचे आई-वडील अभ्यासात चांगली कामगिरी न केल्याबद्दल तिला वारंवार रागावायचे आणि तिच्या मोठ्या बहिणीला जास्त महत्त्व द्यायचे, जी अभ्यासात हुशार होती. तर दुसरी अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांचे एकुलते एक अपत्य होती, ज्यांना मुलगा हवा होता. त्यामुळे तिलाही घरात दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली होती.

आत्महत्येचा विचार अन्…

“आम्ही हे निष्पन्न केले आहे की, या मुली आधी म्हैसूरमधील एका मंदिरात गेल्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चामराजनगरमधील दुसऱ्या मंदिरात गेल्या आणि तिथून माले महादेश्वरा हिल्सकडे निघून गेल्या. त्या दोघीही आत्महत्या करण्याच्या विचारात होत्या. मात्र, तिथे त्यांना दोन तरुण भेटले, त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि हे टोकाचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त केलं”, असं एका वरिष्ठ सीआयडी पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर या दोघी वेगळ्या झाल्या आणि आपापल्या सोबतीसोबत गेल्या. तनिष्का त्या तरुणाबरोबर राहू लागली. त्या तरुणाच्या कुटुंबाने हे नातं स्वीकारल्यानंतर, दोघांनी एका मंदिरात लग्न केलं आणि ते कनकपुरा तालुक्यातील त्याच्या गावात स्थायिक झाले.

दोन्ही मुलींकडे फोन किंवा सिमकार्ड नसल्यामुळे अनेक महिन्यांपासून त्यांचा माग काढणं कठीण झालं होतं. तनिष्काचे आधार कार्ड हेच तिच्याकडे असलेले एकमेव कागदपत्र होते आणि पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून उच्च न्यायालयामार्फत तिच्या आधार कार्डची माहिती मागवली होती. मंगळवारी या प्रकरणात मोठी यश आले.

तपासादरम्यान अधिकाऱ्यांना आढळलं की, तनिष्काने नुकतीच आर्थिक लाभ देणाऱ्या एका सरकारी आरोग्य योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तिचे आधार तपशील वापरले होते आणि त्या अर्जासाठीचा ओटीपी मिळवण्यासाठी तिच्या पतीचा फोन नंबर टाकला होता. पोलिसांनी त्या नंबरचा माग काढून पतीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली, त्यातून ते तनिष्कापर्यंत पोहोचले.

“आम्ही वेगवेगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत होतो. मुलींनी त्यांचे फोन सोबत न घेतल्यामुळे त्यांचा माग काढणं कठीण होतं. नंतर आम्हाला तिच्या आधार तपशीलांवरून एक सुगावा मिळाला. एका सरकारी योजनेचा लाभ घेताना अपडेट केले होते. या माहितीच्या आधारे आम्ही तिचा शोध घेऊ शकलो”, असं तपासात सामील असलेल्या एका वरिष्ठ सीआयडी अधिकाऱ्याने सांगितले. उच्च न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तनिष्काला आता तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तपास अधिकारी आता दुसऱ्या बेपत्ता मुलीचा शोध घेत असून, ती अद्याप सापडलेली नाही.