पाकिस्तानात सक्रिय असलेल्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून बंगळुरू पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. असफूल मलिक अशी या तरुणाची ओळख पटली असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या तरुणाने टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांबरोबर संपर्क साधत त्या संघटनेत सामील होण्याचा आणि पाकिस्तानच्या लष्करावर तसेच भारतात हल्ले करण्याचा कट होता असा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद हालचाली आणि दहशतवादी गटांशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी असफूल मलिक (वय २५) याला बंगळुरूच्या जिगनी शहरातून ताब्यात घेतलं आहे. असफूल मलिक हा मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नाओपारा गावचा रहिवासी आहे. मात्र, तो सध्या जिगनी येथील एपीसी सर्कलजवळ राहत होता आणि तेथेच एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा तरुण काम करत असलेल्या परिसरात पोलीस गस्त घालत होते. मात्र, यावेळी या तरुणाच्या संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी असफूल मलिक या तरुणाची चौकशी केली. या चौकशीदरम्यान या तरुणाने कथितरित्या कबूल केलं की, पाकिस्तानमधील मुस्लिमांवर पाकिस्तानी लष्कराकडून होणाऱ्या कथित अत्याचारामुळे तो संतप्त होता.
तसेच इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाबाबत पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेबाबतही या तरुणाने संताप व्यक्त केला होता. तसेच भारतात मुस्लिमांना अडचणींचा आणि मोठ्या समस्यांचा सामना करावा लागल्यास त्याबाबतही प्रत्युत्तर देण्याबाबत असफूल मलिक याला कथितरीत्या प्रवृत्त केलं जात होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार, मलिक याने अफगाणिस्तानमधील इम्रान हैदर नावाच्या एका व्यक्तीशी फेसबुकवरून संपर्क साधला होता. ती व्यक्ती तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय आहे. मलिक याने अफगाणिस्तानला जाण्यासाठी हैदरची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने व्हिसाचा अर्जही केला होता. मात्र, काही आर्थिक अडचणी आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची आवश्यकता समजून त्याने तो निर्णय रद्द केला अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी मलिकचा मोबाईल तपासला असता तो आणि हैदर यांच्यामध्ये झालेले चॅट्स, अनेक व्हॉइस कॉल्स आणि ऑडिओ संभाषण असे तपशील पोलिसांना आढळून आले आहेत. आरोपीच्या मोबाईलमधून मिळालेले चॅट्स आणि काही ऑडिओ संभाषण व इतर माहितीची पोलीस पडताळणी करत आहेत. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सरू करण्यात आली आहे.
