Bengaluru Woman Burns Boyfriend Alive: बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘वेस्टर्न स्टाईल’ प्रपोजच्या नावाखाली प्रेयसीने प्रियकराला जिंवत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरूच्या अंजनापुरा भागात ही घटना घडली. प्रियकराने दुर्लक्ष केल्याच्या रागातून प्रेयसीने त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
वेस्टर्न स्टाईल प्रपोजचे आमिष
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, संशयित आरोपी महिला, प्रेमा हिने घरात कोणी नसताना तिचा प्रियकर किरणला आपल्या घरी बोलावले होते. “वेस्टर्न स्टाईल” (पाश्चात्य पद्धतीनुसार) प्रपोज करायचे आहे, असे तिने किरणला सांगितले. प्रेमाने प्रियकर किरणचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. किरणने प्रश्न विचारला पण हाच प्लॅन असल्याचे तिने सांगितले.
रॉकेल ओतून जिवंत जाळले
“वेस्टर्न स्टाईल” प्रपोजचा भाग असल्याचे सांगत तिने किरणला डोळ्यांवर पट्टी आणि हात-पाय दोरीने बांधले असताना अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला आग लावून दिली. आगीत होरपळल्यामुळे किरणचा जागीच मृत्यू झाला. हात-पाय दोरीने बांधले असल्याने त्याला हालचाल करता आली नाही. अखेर त्याचा मृत्यू झाला. प्रेमा आणि किरण हे दोघे राजाजीनगरमधील एका टेलिकॉम स्टोअरमध्ये एकत्र काम करत होते.
दुर्लक्ष केल्याचा राग
प्रियकर गेल्या काही दिवसांपासून प्रेमाकडे दुर्लक्ष करत होता. याचा प्रचंड राग संशयित प्रेमाच्या मनात होता. किरण वारंवार इग्नोर करत असल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले, असे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रेमाने घरात आधीच रॉकेलचा कॅन तयार ठेवले होते. शिवाय तिने या घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईल केल्याचा आरोप देखील केला जात आहे. पोलिसांनी संशयित प्रेमाला अटक केली असून तिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
