Bengaluru Crime News: एकतर्फी प्रेमातून किंवा प्रेमात धोका मिळाल्यानंतर जोडीदार अत्यंत भावनिक होऊन टोकाचे निर्णय घेतात. कधी स्वतःच आत्महत्या करतात तर कधी जोडीदाराची हत्या केली जाते. अशा घटना सातत्याने समोर येत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूत ही घटना घडली असून या घटनेत २७ वर्षीय प्रेयसीने आपल्या प्रियकराची निर्घुण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे प्रियकराची हत्या करताना तिने व्हिडिओ काढला असल्याचाही दावा करण्यात येतोय. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बंगळुरूमध्ये मंगळवारी दुपारी एका २७ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ब्यादराहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनानगर येथे घडली. मृत किरण आणि आरोपी प्रेमा हे दोघेही एका खासगी कंपनीत एकत्र काम करत होते. तिथंच त्यांचं प्रेमप्रकरण जुळलं. पण कालांतराने दोघांमध्ये काहीतरी खटके उडायला सुरुवात झाली.

वेस्टर्न स्टाईल प्रपोज

पोलीस तपासानुसार, आरोपीने किरणला आपल्या घरी बोलावले होते. तिथे वेस्टर्न स्टाइल प्रपोज करायचे असल्याचे सांगून त्याचे हात-पाय बांधले आणि डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर त्याच्यावर रॉकेल ओतून त्याला पेटवून देण्यात आले, यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी रॉकेल उपलब्ध असल्याने हा कट पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. तसंच, प्रियकराला जाळत असताना तिने व्हिडिओही रेकॉर्ड केला असल्याचं म्हटलं जातंय.

दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात तणाव होता. किरण मला टाळत होता, माझ्याकडे लक्ष देत नव्हता,असं या प्रेयसीने म्हटलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच रागातून प्रेमाने हे कृत्य केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.