तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू कुठे आहेत यावरून तसेच त्यांच्या स्वास्थ्यावरून विशेषत: समाजमाध्यमांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. तेल अविवमध्ये १४ मार्चला झालेल्या एका महत्त्वाच्या लष्कराच्या बैठकीला नेतान्याहू अनुपस्थित राहिले. त्यानंतर ते जिवंत आहेत की नाहीत, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने नेतान्याहू यांच्या मृत्यूची ही अफवा असल्याचे रविवारी स्पष्ट केले. मात्र या संदर्भातील अधिकृत निवेदन उशिरापर्यंत प्रसिद्ध केले नव्हते. त्यापूर्वी नेतान्याहू यांची एक ध्वनिचित्रफीत शुक्रवारी प्रसारित करण्यात आली. मात्र त्यामध्ये त्यांच्या एका हाताला सहा बोटे असल्याचे काही प्रेक्षकांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे ही ध्वनिचित्रफित ‘एआय’निर्मित असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आणि खरे नेतान्याहू कुठे आहेत, असे प्रश्न समाजमाध्यमांवर विचारले गेले.इराणबरोबरील युद्ध चिघळत असल्याच्या आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू जिवंत आहेत की नाहीत, याविषयी चर्चा होत आहेत. काही इंग्रजी वृत्तपत्रांची संकेतस्थळे आणि काही वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांवर यासंबंधीचे वृत्तही प्रसिद्ध झाले.
इस्रायलमध्ये शनिवारी आयोजित लष्करातील उच्चस्तरीय अधिकार्यांच्या बैठकीला नेतान्याहू यांच्याऐवजी संरक्षणमंत्र्यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वृत्ताची चर्चा सगळीकडे होऊ लागल्यानंतर नेतान्याहू यांच्या कार्यालयाने हे वृत्त खोटे असल्याचे तुर्कीतील एका वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले. तसेच, नेतान्याहू सुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र, या संदर्भातील अधिकृत निवेदन कार्यालयाने जारी केल्याचे वृत्त नाही.दुसरीकडे, नेतान्याहू यांच्या मृत्यूची अफवा असताना, नेतान्याहू जिवंत असतील, तर त्यांना शोधून मारू, अशी धमकी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने दिल्याचे वृत्त आहे.
