वृत्तसंस्था, जेरुसलेम
इराणविरुद्ध युद्ध सुरू असतानाही इस्रायलमधील पोलिसांनी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना दोन वेळा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. इस्रायलमधील हारेत्झ या वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘बिबिलीक्स’ प्रकरणी तपासात अडथळे आणल्याप्रकरणी चौकशीचा भाग म्हणून नेत्यानाहू यांना समन्स बजावले जात होते.
इस्रायलच्या लष्करप्रमुखांसह नेतान्याहू यांच्या दोन सहकाऱ्यांनी, हमासशी वाटाघाटीसंबंधातील ‘बिबिलीक्स’ चौकशीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. नेतान्याहू यांनी रात्री उशीरा त्यांची भेट घेतली होती. त्याबद्दल जबाब नोंदवण्यासाठी त्यांना समन्स बजावले जात होते. पण त्यासाठीचे दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले असे लॉड डिस्ट्रिक्ट जज अमित मिशेल्स यांनी अलीकडेच सुनावणीदरम्यान सांगितले.
न्यायाधीश मिशेल्स यांनी याप्रकरणी नेतान्याहू चौकशीसाठी उपलब्ध नसल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली नाही. पंतप्रधान सध्या इराणविरुद्ध युद्धात रणनीती आखण्यात मग्न आहेत, अशी समजुतीची भूमिका न्यायाधीशांनी घेतल्याचे हारेत्झच्या वृत्तावरून दिसते. अॅटर्नी जनरल गाली बहारव मियारा यांनी नेतान्याहूंच्या चौकशीला मंजुरी देण्यास विलंब केल्यामुळे जबाब नोंदवण्यास उशीर होत असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. ‘बिबिलीक्स’ प्रकरणी नेतान्याहू यांचे विश्वासू सहकारी जोनाथन युरिच यांच्यावर निर्बंध अटी लादल्या गेल्या आहेत.
‘बिबिलीक्स’ काय आहे?
गाझा युद्ध सुरू असातना हमाससंबंधी काही गोपनीय दस्तऐवज २०२४मध्ये उघड करण्यात आले होते. ते जर्मन वर्तमानपत्र बिल्डने प्रसिद्ध केले होते. हमासला युद्धामध्ये तातडीने शस्त्रसंधी नको असल्याचे त्या दस्तऐवजांमध्ये सूचित करण्यात आले होते. त्याच्या तपासाअंती पंतप्रधान नेतान्याहू यांचा सहकारी आणि चार लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर वाटाघाटी फिसकटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त खबरदारी घेऊन जबाब नोंदवला जात आहे याची प्रशंसा केली पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या उच्च कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून घेतल्या जात आहेत. – न्यायाधीश अमित मिशेल्स
