Benjamin Netanyahu : इस्रायल आणि अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराणमध्ये केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष पेटला आहे. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर हा‍तमिळवणी करत इराणवर पहिल्यांदा हल्ला करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. अयातुल्ला खामेनी यांची राजवट ही अण्वस्त्र केंद्र आणि जमिनीखालील बंकर्स उभारत होती, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने हल्ला केला असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.

इराणने नवीन ‘न्यूक्लियर फॅसिलिटी’च्या बांधकामाचा वेग प्रचंड वाढवला होता, ते लवकरच इतके अभेद्य बनले असते की त्यांना नंतर नष्ट करता आले नसते. त्यामुळे तात्काळ लष्करी कारवाई करणे गरजेचे बनले होते, असा दावा नेतान्याहू यांनी केला आहे.

फॉक्स न्यूजला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू यांनी आरोप केला की, इराणने नवीन केंद्र उभारण्यास सुरूवात केली होती, ज्यामध्ये इराणचे बॅलिस्टिक मिसाइल इन्फ्रास्ट्रक्चर आणि अणुकार्यक्रम या दोन्हींचे संरक्षण करण्यासाठी जमिनीखालील बंकर्ससह अनेक नवीन तळ उभारले जात होते. नेतान्याहू यांच्या मते, हे तळ काही महिन्यांतच नंतर त्यांना धक्काही लावता येणार नाही इतके मजबूत झाले असते.

“आम्हाला आत्ताच कारवाई करावी लागली याचे कारण ते (इराण)… आम्ही त्यांचे अणुकेंद्र आणि बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्रामला लक्ष्य केल्यानंतर, वाटले होते की त्यांनी धडा घेतला असेल. पण तसे झाले नाही, कारण ते सुधारणा होणे अशक्य असलेले आहेत. ते अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याच्या ध्येयाने पूर्णपणे पछाडलेले आहेत,” असे नेतान्याहू म्हणाले.

नेतान्याहू यांनी युक्तीवाद केला की, त्यांनी कारवाई करण्यास उशीर केला असता तर प्रतिक्रिया देण्याची संधी कायमची हातातून गेली असती. तसेच त्यांनी इशारा दिला की, जर तो टप्पा गाठला गेला असता तर इराण इस्रायलला धमकावण्याच्या, अमेरिकेवर दबाव टाकण्याच्या आणि आपल्या क्षमता इतर देशांच्या विरोधात वापरण्याच्या स्थितीत पोहोचला असता. तसेच नेतान्याहू यांनी यावेळी असेही स्पष्ट केले की, आत्ता कारवाई केली नसती तर इराणने ‘स्ट्रॅटेजिक इम्यूनिटी’ मिळाली असती.

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे समर्थन करण्याचे इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेबद्दलची चिंता हे एक मुख्य कारण राहिले आहे. इराण भविष्यात अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे, असा दावा दोन्ही देशांनी केला आहे.

इस्रायल आणि आमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य केले?

इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सीचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी सोमवारी स्पष्ट केले की, नुकतेच करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या कोणत्याही अणु प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. ते म्हणाले, “बुशेहर न्यूक्लिअर पॉवर प्लान्ट, तेहरान रिसर्च रिअॅक्टर किंवा इतर न्यूक्लिअर फ्युल सायकल फॅसिलिटी किंवा इतर कोणत्याही अणु प्रकल्पाचे नुकसान झाल्याचे किंवा त्यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही संकेत आम्हाला मिळालेले नाहीत.”

“डिप्लोमसी कठीण आहे, पण ती कधीही अशक्य नसते. न्यूक्लिअर डिप्लोमसी तर त्याहूनही अधिक कठीण आहे, पण तीही अशक्य कधीच नसते,” असे ते पुढे म्हणाले.