Benjamin Netanyahu Health News: इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध युद्ध सुरु केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सध्या अनिश्चितकाळासाठी युद्धविराम जाहीर केला आहे. पण, गेल्या दीड वर्षापासून इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू एक गंभीर आजाराचा सामना करत आहेत. इराण युद्ध सुरु असताना देखील त्यांच्यावर उपचार सुरु होते, अशी स्वत: नेतान्याहू यांनी माहिती दिली आहे. अलिकडेचे त्यांचे वैद्यकीय अहवाल समोर आले असून, त्यांनी या आजाराची आणि सद्यस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे.
प्रोस्टेट कॅन्सरचे निदान आणि उपचार
नेतान्याहू यांचा वार्षिक वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. दीड वर्षापूर्वी त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे समोर आले होते, अशी माहिती पहिल्यांदाच नेतान्याहू यांनी दिली आहे. पण, यावर यशस्वी उपचार केल्याचेही त्यांनी सांगितले. “वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी मुद्दाम दोन महिन्यांचा विलंब केला. कारण युद्धाच्या काळात विनाकारण खोट्या बातम्या पसरविण्याची संधी इराणींना मिळू नये असा त्यामागे उद्देश होता”, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. नेतान्याहू यांनी याबाबत एक सविस्तर पोस्ट एक्सवर लिहली आहे.
यशस्वी शस्त्रक्रिया
“दीड वर्षापूर्वी मला प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे समजले, यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यावर तात्काळ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मी तेव्हापासून निरंतर वैद्यकीय निरक्षणाखाली आहे. मी व्यवस्थित आणि तंदुरुस्त आहे, माझी शारीरिकदृष्ट्या मी फिट आहे. आणि माझी प्रोस्टेट कॅन्सर पूर्णपणे बरा झाला आहे”, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. प्रोस्टेट कॅन्सरची गाठ अर्धा सेंटीमीटरपेक्षा लहान होती, असेही नेतान्याहू सांगतात.
देवाचे आणि डॉक्टरांचे मानले आभार
गाठ लहान होती आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या वयाच्या पुरुषांमध्ये हे सामान्य आहे. पण, चांगली बाब म्हणजे ही गाठ अजूनतरी वाढत नव्हती. तरीही डॉक्टरांनी मला दोन पर्याय दिले होते. तुम्ही या गाठीसह अनेकजण राहतात त्याप्रमाणे सामान्य उपचार घेऊन दिवस ढकलू शकता किंवा त्यावर शस्त्रक्रिया करु शकता, असे पर्याय ठेवले. मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता मी ठणठणीत बरा आहे. यासाठी मी देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानतो, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
इस्रायली नागरिकांना आवाहन
नेतान्याहू यांच्यावर जेरुसलेम येथील रुग्णालयात उपचार झाले. उपचार काळात त्यांनी पुस्तकं वाचन केल्याचा उल्लेख त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. नेतान्याहू यांनी इस्रायली नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे तसेच वारंवार आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
