Benjamin Netanyahu on India: इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ होत आहेत, याची प्रचिती इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या अलीकडच्या विधानानंतर आली. भारताने गेल्या काही काळापासून इस्रायलला दिलेला पाठिंबा कौतुकास्पद अससल्याचे ते म्हणाले. इस्रायलवर जगभरातून टीका होत असताना भारताने मात्र आम्हाला पाठिंबा दिला, असा विशेष उल्लेखही नेतान्याहू यांनी केला. गुरुवारी वेस्ट बँकमधील एका परिषदेत बोलत असताना नेतान्याहू यांनी भारताबद्दल टिप्पणी केली.
इस्रायलला भारतातून प्रचंड समर्थन असल्याचे सांगताना नेतान्याहू म्हणाले, “जगातील अनेक देशांनी आम्हाला अवैध ठरवले, मात्र भारताने असे केले नाही. इस्रायलसाठी भारतीयांच्या मनात प्रचंड प्रेम आहे. मला तर वाटते, इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात माझे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.”
पंतप्रधान नेतान्याहू पुढे म्हणाले, “इस्रायलच्या जागतिक संबंधांमध्ये भारताला विशेष स्थान आहे. दोन्ही देशांमधील संबंद पूर्वीपेक्षा अधिक बळकट आणि सातत्याने आणखी दृढ होत आहेत.” फेब्रुवारी २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरुसलेमचा दौरा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी नेतान्याहू यांची टिप्पणी समोर आली आहे. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये नवीन उपक्रम, विशेष सामरिक भागीदारी याबद्दल चर्चा झाली.
Netanyahu:
— Clash Report (@clashreport) May 28, 2026
I’ll say this: we face delegitimization in much of the world — but not in India.
In India, there is an absolutely crazy love for Israel, truly crazy.
I think I have more followers from India than from anywhere else. pic.twitter.com/FRIo2cdVb3
पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांच्या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान, कृषी, संरक्षण, जल व्यवस्थापन, फिनटेक आणि अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबद्दलही सहमती झाली.
पंतप्रधान मोदींची पहिली भेट ठरली निर्णायक
पंतप्रधान मोदी यांनी २०१७ साली पहिल्यांदा इस्रायलला भेट दिली होती. ही भेट ऐतिहासिक ठरली. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. या भेटीनंतर भारत आणि इस्रायल यांच्यात पूर्वीपेक्षा अधिक चांगले संबंध निर्माण झाले. या भेटीनंतर भारत आणि इस्रायलने सुरक्षा, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने भागीदारी वाढवत नेली. भारताला सुरक्षा उपकरणांचा पुरवठा करणारा इस्रायल हा एक प्रमुख देश बनला आहे.
गाझामधील ७० टक्के भाग ताब्यात घेण्याचे आदेश
दरम्यान वेस्ट बँक येथील कार्यक्रमात नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा गाझा पट्टीत लष्करी कारवाई करणार असल्याचे सुतोवाच केले. गेल्या काही महिन्यांपासून इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील वातावरण तापले आहे. तसेच इस्रायलने हमासविरोधात सुरू केलेला संघर्ष अद्याप थंडावलेला नाही. त्यातच नेतान्याहू यांच्या नव्या आदेशामुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिन्यामिन नेतान्याहू यांनी इस्रायली संरक्षण दलाला (IDF) गाझा पट्टीचा ७० टक्के भाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वेस्ट बँकमधील एका कार्यक्रमात बोलताना बिन्यामिन नेतान्याहू यांनी हे भाष्य केले आहे.
