डिजिटल माहिती वापरावरील र्निबध उठवण्याची मागणी

अमेरिकेतील अध्यक्षीय शर्यतीत असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बेर्नी सँडर्स यांनी त्यांना प्रचारात डिजिटल माहिती साठय़ाचा वापर करण्यास आडकाठी आणल्याच्या प्रकरणी त्यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षावर खटला भरला आहे.

सँडर्स यांनी दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, आपल्याला प्रचारात दरदिवशी देणग्यांमध्ये ६ लाख डॉलर्सचा फटका बसत आहे, कारण डेमोक्रॅटिक पक्ष डिजिटल माहितीपासून आपल्याला वंचित ठेवत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने सँडर्स यांच्या प्रचारात डिजिटल माहितीची उपलब्धता बंद केली होती. त्यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले. सँडर्स यांनी डिजिटल माहितीचा वापर करताना श्रीमती क्लिंटन यांच्या प्रचारातील माहितीत घुसखोरी केली त्यामुळे त्यांना डिजिटल माहितीचा वापर करू देण्यावर र्निबध घालण्यात आले.

डेमोक्रॅटिक पक्ष आपल्या प्रचारात विनाकारण अडथळे आणीत आहे व ते आपल्याला मान्य नाही. व्यक्तिगत पातळीवर कुणी हिलरी यांना पाठिंबा देत असेल तर त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही, पण त्यांनी आपल्या प्रचारात घातपात करू नये, असे सँडर्स यांचे प्रचार व्यवस्थापक जेफ विव्हर यांनी सांगितले. हिलरी क्लिंटन यांचे प्रसिद्धी सचिव ब्रायन फॅलन यांनी सांगितले की, याबाबत लवकर तोडगा काढावा. न्यायालय याबाबत निकाल देईल व सँडर्स यांना मतदार यादी पाहण्याची संधी मिळेल व गोपनीय माहिती मात्र दिली जाणार नाही. फॅलन यांनी असा आरोप केला की, सँडर्स यांनी चार वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून गोपनीय माहितीची चोरी केली आणि ती माहिती सँडर्स यांच्या खात्यावर सेव्ह करण्यात आली.